वर्धा : खाद्यतेल हे आहाराचा मुख्य घटक. ते कोणते व कसे वापरायचे याचे पण सल्ले मिळत असतात. कारण अयोग्य तेल आरोग्यास अपायकारक व परिणामी शरीराची हानी अटळ. पण असे तेल बनावट आणि ते पण इतर देशातून चोरमार्गे आणत धडाक्यात विकल्या जात असेल, तर किती मोठा हानिकारक खेळ खेळल्या गेला, याची कल्पना करवत नाही. हे प्रकरण त्यातलेच.

FDA ची मोठी कारवाई

२.१० लाख रुपये किंमतीचे निकृष्ट दर्जाचे नेपाळी खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. वर्धा शहरातील पटेल चौक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अचानक छापा मारून २ लाख १० हजार ८८० रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे नेपाळी रिफाईंड सोयाबीन तेल जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी पटेल चौकातील ‘मे. कादर भाई सन्स’ यांच्या गोदामाची अचानक पाहणी केली. तपासणीदरम्यान गोदामात विक्रीसाठी साठवून ठेवलेले १५ किलोचे कंपनी पॅक टिन (डबे) आढळले. हे सर्व टिन अत्यंत अस्वच्छ आणि गंज लागलेल्या अवस्थेत होते. अधिक चौकशी केली असता, हे रिफाईंड सोयाबीन तेल थेट नेपाळवरून आयात करण्यात आल्याची माहिती समोर आली.

करचुकवेगिरी आणि शुद्धतेबाबत संशय

बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये हे तेल उपलब्ध असल्याने या तेलाच्या शुद्धतेबाबत आणि दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाला संशय आला. ही करचुकवेगिरी आहे की बेकायदेशीर साठा, या दृष्टीने तपास सुरू आहे.

जप्त केलेला साठा

एकूण साठा – ८८ टिन (प्रत्येकी १५ किलो)

एकूण वजन – १,३१८ किलो.

एकूण किंमत- २,१०,८८० रुपये.

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा सील करून जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे नमुने विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे आणि सहाय्यक आयुक्त प्र. भा. टोपले यांनी पार पाडली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध साठवणूक केलेले पदार्थ, तंबाखू इत्यादींवर अशीच तीव्र कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध विभागाने दिला आहे.