नागपूर: मान्यता नसलेले बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या २९ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले तर २५ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांची कृषी विभाग,जिल्हा परिषदे कृषी विभागाच्या ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर १३ असे एकूण १४ भरारी पथक स्थापन करण्यात आले. या पथकामार्फत ३ बियाणे उत्पादक आणि ४३४ कृषि सेवा केंद्रांची आकस्मिक तपासणी केली.
बियाणांचे १४३, रासायनिक खतांची १३७ आणि कीटकनाशकांचे २५ नुमने तपासणीसाठी घेतले. ते प्रयोगशाळेत पाठवले. यापैकी खतांचे १३, बियाणे व कीटकनाशकाचा प्रत्येकी एक नमुना अप्रमाणित आढळून आले. गुणवत्ता नियंत्रण मानकांची पूर्तता न केल्याने एकूण २५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तसेच २९ कृषी सेवा केंद्राना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार असल्यास तक्रार निवारण कक्ष : संपर्क क्रमांक -८८३०२९०८८७ किवा टोल फ्री क्रमांक – १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.