न्यायालयाकडून पतीला घटस्फोट मंजूर

मोलकरणीपासून ते इतर अनेक महिलांशी पतीचे अनैतिक संबंध असून आपण घरात नसताना पती महिलांसोबत संबंध प्रस्थापित करतो, असे बिनबुडाचे आरोप करणारी महिला ही क्रूर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असून पतीची घटस्फोटाची विनंती मान्य केली आहे.

कल्याण येथील निवासी मनोज आणि नागपुरातील निवासी उर्मिला (नावे बदललेली) यांचा २६ ऑक्टोबर १९९७ रोजी विवाह झाला. त्यानंतर उर्मिला ही पतीसह कल्याण येथे राहू लागली. दोघेही सरकारी कार्यालयात स्टेनोग्राफर म्हणून वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरीत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ३० ऑगस्ट २००३ ला पतीशी खटके उडाल्यानंतर तिने दोन्ही मुलांसह घर सोडले. पत्नीने घरी परत येऊन संसार करावा म्हणून त्याने खटला दाखल केला. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने त्याची विनंती फेटाळली.

त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. या अपिलावर न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उर्मिला ही घरच्या मोलकरणीपासून ते इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून मानसिक प्रतारणा करते, असा मनोजचा दावा होता. याशिवाय तिने कोणतेही कारण नसताना आपले घर सोडले आणि पुन्हा आजवर कधीच परतली नाही. त्यामुळे तिचे वागणे क्रूर असून त्या आधारावर घटस्फोट मंजूर करण्याची विनंती मनोजने केली. दरम्यान, उर्मिलाही आपल्या आरोपांवर ठाम राहिली.

सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोजला घटस्फोट मंजूर करताना आदेशात म्हटले की, अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी पतीवर करते. याशिवाय पतीचे मोलकरणीबरोबरही अनैतिक संबंध असून आपल्या एक मैत्रिणीशी त्याने विवाह केल्याचे गंभीर आरोप केले, परंतु हे आरोप करताना तिने एकाही महिलेचे नाव दिले नाही किंवा पुरावेही सादर केले नाही. यावरून उर्मिलाने पतीवर अनैतिक संबंधाचे केलेले गंभीर आरोप बिनबुडाचे असून असे वर्तन क्रूरतेचे आहे.

मुलगा अभियांत्रिकी कॉलेजात

या दाम्पत्याचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून मुलगी विवाहायोग्य आहे. त्यामुळे मुलाच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या लग्नाचा अर्धा खर्च वडिलांनी उचलावा, असा पर्याय ठेवून सामंजस्याने घटस्फोट मिळविण्याचा एकदा प्रयत्न झाला. मात्र, पत्नीने हा प्रस्ताव फेटाळला व एकमुस्त १५ लाखांची मागणी केली. परंतु पतीने तो प्रस्ताव नाकारत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.