अठाराविश्व दारिद्रय़ाचा पालकांना फटका

ज्योती तिरपुडे, नागपूर</strong>

भीषण दारिद्रय़ाचे चटके सहन करणाऱ्या एका कुटुंबाला केवळ ३०० रुपयांसाठी चार महिन्यांच्या मुलाला गमवावे लागले. मुलाच्या विरहाने आईवडील बेहाल असून अनेक वर्षांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली मात्र, काही महिन्यातच त्यांचा हा आनंद गरिबीमुळे हिरावला गेला. कोंढाळी तालुक्यात शेडके कुटुंबीयांना हा आघात सहन करावा लागला असून पैशाअभावी त्यांच्या पाचवीतील मुलीवरही शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

हा भीषण प्रकार लखोटिया भुतडा विद्यालयातील एका शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. शेडके यांची मोठी मुलगी राणी पाचवीत आहे. ती दोन दिवस शाळेत आली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते  हर्षवर्धन ढोके तिच्या घरी गेले. घरातील भीषण दारिद्रय़ पाहून त्यांनाही वाईट वाटले. तीन दिवसांपूर्वी राणीचा भाऊ मरण पावल्याचे त्यांना कळले.

चार महिन्यांपूर्वी कविता सुभाष शेडके यांनी एका बाळाला (रुद्र)जन्म दिला. चार दिवसांपूर्वी त्याला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. मात्र, त्यासाठी आवश्यक उपचार कोंढाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुद्रला मिळू शकला नाही. डॉक्टरांनी त्याला नागपूरला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी ३०० रुपये हवे होते. कविता शेडके यांनी गयावया करून अनेकांना त्याविषयी विनंती केली. मात्र, कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. पैसे नसल्याने लहानग्या रुद्रला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्याला जीव गमवावा लागला. ‘आम्ही दोघेही  हातमजुरी करतो. गर्भवती असल्याने हातमजुरीला जाऊ शकले नाही. प्रसूतीनंतर अशक्तपणामुळेही जाता आले नाही. त्यामुळे पती जेवढे कमावून आणत होते, त्यावरच आरोग्य केंद्रात प्रसूती, घरखर्च आणि मुलीचे शिक्षण सुरू होते. घरात एक पैसा शिल्लक नव्हता, त्यामुळे नागपूरला जाता आले नाही, असे हुंदके अनावर झालेल्या कविता शेडके यांनी सांगितले.

अमरावती मार्गावरील कोंढाळी हे मोठे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे नेहमी  येथे अपघात होत राहतात. मात्र, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा आपत्कालीन सेवेचा उपयोग होत नाही.

शेडके कुटुंबीय त्यांचे चार महिन्यांचे बाळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. मात्र, ते येथे येण्याआधीच मृत झाले होते. त्यामुळे त्याच्यावर उपचाराची संधीच नव्हती. बाळाला न्युमोनियाचा गंभीर संसर्ग झालेला होता. शेडके कुटुंबीयांनी आधी  त्याला खासगी दवाखान्यात नेले होते. कोंढाळीला एमबीबीएस, प्रसूती तज्ज्ञ किंवा बालरोगतज्ज्ञ नाही.

– डॉ. सुनील येरमल, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र (कोंढाळी)