चंद्रपूर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची दखल अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे. ‘फोर्ब्स’ने दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या मासिकात व ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मासिकाने एखाद्या मराठी चित्रपटाची दखल घेणे ही संपूर्ण मराठी चित्रपट सृष्ठीसाठी अभिमानाची बाब आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका आणि आजूबाजूच्या गावात झाले असून २५ दिवसांमध्ये ते पूर्ण झाले, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली. शैलेश दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून के सेरा सेरा या डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या ४ नोव्हेंबरला ‘पल्याड’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा… नागपूर : कारागृहातील कैद्याकडे सापडला गांजा व भ्रमणध्वनीच्या १५ बॅटरी

‘पल्याड’ने आजवर दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल नवी दिल्ली, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सिक्कीम, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबई, नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हल, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कोलकाता, कोकण मराठी चित्रपट महोत्सव, या चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. याखेरीज सिनेक्वेस्ट व्हीआर अँड फिल्म फेस्टिव्हल यूएसए, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया टोरंटो, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, इंटरनॅशनल कॅास्मोपॅालिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हाँगकाँग, बॉयडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन आणि रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युसएमध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा… नव्या पिढीमधील पाश्चात्य पदार्थांचा मोह फार काळ टिकणार नाही ; प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मत

राष्ट्रीय पारितोषिक विजेते शशांक शेंडे आणि देविका दफ्तरदार यांच्यासोबत बल्लारशहामधील बाल कलाकार रुचित निनावे तसेच नागपूरचे देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, चंद्रपूरमधील स्थानिक सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते आणि मुंबईमधील अभिनेते गजेश कांबळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. रवींद्र शालिकराव वांढरे, गौरव कुमार, वनिता पाटील, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, माया विलास निनावे, लक्ष्मण रवींद्रनाथ निमजे आणि रोशनसिंग बघेल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गीतकार प्रशांत मडपुवार आणि अरुण सांगोळे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, सॅम ए. आर., जगदीश गोमिला आणि तुषार पारगावकर यांनी स्वरसाज चढवला आहे. अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिका भिडे, सुस्मिरता डावलकर आणि केतन पटवर्धन यांनी आपल्या सुरेल गायनाद्वारे गीतांमधील शब्दांना अचूक न्याय दिला आहे. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे आणि लोकेश कनिथी यांनी दिले आहे. डीओपी मोहर माटे यांची सुरेख सिनेमॅटोग्राफी आणि मनीष शिर्के यांनी केलेले संकलन प्रेक्षकांना भावणारे आहे. स्वप्निल धर्माधिकारी यांनी रंगभूषा केली असून, विकास चहारे यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन अनिकेत परसावार यांनी केले आहे, तर गिरीश रामटेके यांनी ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous forbes magazine notified marathi film palyad asj
First published on: 06-09-2022 at 11:10 IST