अकोला : ‘मुली नेहमी दरिद्री मुलाच्याच मागे लागतात, आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाणाऱ्या त्या मुली आपल्या पुढील आयुष्यात सुखी असल्याचं सांगावं, तर मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासेल,’ असे वक्तव्य प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. मी काहीही केलं तरी लोक शिव्या देतात, त्यामुळे यापुढेही कीर्तन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अकोला जिल्ह्यात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. इंदुरीकर महाराज म्हणाले, “मुलगी हुशार मुलावर कधीही प्रेम करत नाही, ती कधीही चांगल्या मुलाच्या प्रेमात पडत नाही. मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते. शेतातील मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरतो अशा मुलांच्या मागे मुली लागतात. एखादी मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून गेली तर ती आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचं सांगावं, मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो. आई-बापाची मान खाली केली ती मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही.”

मी काहीही केलं तरी लोक शिव्या देतात, मी फक्त सत्य बोलतो. लोक टीका करतात. ३१ वर्ष आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, मग थोड्यासाठी कशाला बंद करायचं असं म्हणत यापुढेही आपण कीर्तन सुरू ठेवणार असल्याचे इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केले.

तरुणांनी मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नये. पेनमध्ये कॅमेरे आहेत. टपरी पेटवाताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, १० वर्षांची शिक्षा होते. आतापर्यंत दंगलीमध्ये गरिबांची पोरं आत गेली आहेत, मोठ्या श्रीमंतांची पोरं नाहीत आणि ते कधी जाऊ देणारही नाहीत. तुमचा वापर फक्त ‘यूज आणि थ्रो’साठी होतो, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

‘दीड वर्षे शेती केली, काहीही खरं नाही’

आजकाल शाळेतील मुलं रम्मी खेळून भिकारी झाले आहेत. पोरं अभ्यास करणारे नाहीत. अभ्यास हा विषय त्यांनी सोडून दिला. बारावी आणि दहावीची परीक्षा तोंडावर आल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांत परीक्षा काळात मोबाईलवर बंदी घालावी, अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी केली. दीड वर्षे शेती करून पाहिली, काहीही खरं नाही. इतर काहीही करा, भाजी आणि किराणा वरच्यावर भरता येईल, याची सोय ठेवा, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.