मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्याची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यात काही भागात शेतकरी संप सुरू असताना रविवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग हे भाषण करीत असताना एका शेतकऱ्याने दूध आणि शेतमालाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणाऱ्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला. भाषणबाजी बंद करा, आधी सातबारा कोरा करा, अशी मागणी या शेतकऱ्याची होती.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि मदर डेअरी व व्हेजिटेबल प्रायव्हेट लि.च्यावतीने नागपुरात नवीन दुग्धशाळा आणि मदर डेअरीचे उद्घाटन झाले. त्यानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे, या पाश्र्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री नागपुरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर असल्याने ते काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

मात्र, या दोन्ही नेत्यांनी यावर अवाक्षरही काढले नाही. दरम्यान, कृषीमंत्री राधामोहन सिंग यांचे भाषण लांबतच चालल्याने सभागृहात उपस्थित एका शेतकऱ्याने थेट कृषीमंत्र्यांना ‘भाषणबाजी बंद करा आणि सात-बारा कोरा करा’, ‘दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव द्या’ असे ओरडूनच सांगितले, परंतु सिंग यांनी भाषण सुरूच ठेवले, उलट शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनी आणखी आवाज वाढविला. दरम्यान, सभागृहात अस्वस्थता निर्माण झाली. व्यासपीठावरून नितीन गडकरी तसेच अन्य नेत्यांनी संबंधित शेतकऱ्यास बसण्यास सांगितले. मात्र, शेतकरी पुन्हा-पुन्हा सातबारा कोरा आणि दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव द्या, अशी मागणी करीत होता. त्याला सभागृहात बसलेले शेतकरी टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. मात्र, राधामोहनसिंग यांनी भाषण रेटून नेले. शेवटी पोलिसांनी शेतकऱ्याला बसवले.