अमरावती : दुचाकीने शेतातून घरी येत असताना अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा शेतशिवारा नजीक दुचाकीचा अचानक स्फोट होऊन दुचाकी चालक शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नंदू उर्फ ज्ञानेश्वर मधुकर गणगणे (४२, रा. माळीपुरा अचलपूर) असे मृताचे नाव आहे .
माळीपुरा येथील श्रीवेद हार्डवेअरचे संचालक नंदू गणगणे हे आपल्या दुचाकीने सावळी दातुरा येथील शेतात गेले होते. मजुरांना कामे समजावून दुपारी तीनच्या सुमारास ते घरी परत येण्यासाठी निघाले. सापन नदीच्या काठावरून पुलावर चढत असताना त्यांच्या दुचाकीचा अचानक स्फोट झाला यात ते गंभीररित्या जळाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला व दुचाकी देखील जळून खाक झाली. इतर शेतकरी मदतीला धावून येण्याआधीच गणगणे यांचा जळून मृत्यू झाला होता. त्यांना दोन लहान मुले, वृद्ध आई, वडील व पत्नी आहे.परतवाडा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्पारीय तपासणी करता अचलपूर उपजिल्हा रुग्णांलयात पाठवला असून अति उष्णतेने दुचाकीचा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.



