अवंतिका मिसाळने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
यवतमाळ : दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाची विद्यार्थिनी अवंतिका ललित मिसाळ हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा‘नीट’मध्ये कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय घवघवीत यश संपादन केले. तिला ६१० गुण मिळाले आहे. राष्ट्रीय श्रेणीत तिचा १६४७४ क्रमांक असून इतर मागसवर्गीय श्रेणीत ती ६८३५ व्या क्रमांकावर आहे. अवंतिका शेतकरी कन्या आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ टी-शर्ट ठरतेय लक्षवेधी
नीट आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गास प्राधान्य देतात. शिकवणीशिवाय नीट परीक्षेत यश मिळत नसल्याची भावना पालकांसह विद्यार्थ्यांचीदेखील झाली आहे. त्यामुळे नांदेड, अकोला, नागपूर, लातूर आदी शहारांमध्ये ‘नीट’चे ‘शिकवणी कारखाने’ निर्माण झाले आहे. खासगी शिकवणी वर्ग हे आजच्या शिक्षणाची अपरिहार्यता झाले असताना अवंतिकासारख्या विद्यार्थिनी या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा दीप ठरत आहे. शिकवणी वर्गाशिवाय यश मिळू शकते, हे तिच्या यशाने अधोरेखित केले आहे.
हेही वाचा : नागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक
अवंतिकाचे वडील शेतीसोबतच घरांचे रंगकामही करतात. मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुली असून अवंतिका ही धाकटी मुलगी. ती मूळची सोयजना (ता. मानोरा जि. वाशीम) येथील असून तिने बारावीची परीक्षा दिग्रस येथील दिनबाई विद्यालयातून दिली, तर दहावीपर्यंतचे शिक्षण दिग्रसच्याच मोहनाबाई शाळेत घेतले आहे. अवंतिकाचे कुटुंब तिच्या शिक्षणासाठी दिग्रसला भाड्याचे घर घेऊन राहत होते. तिच्या या यशात तिच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असून मुलगी डॉक्टर होणार असल्याचा आनंद असल्याचे तिची आई मीनाक्षी आणि वडील ललित यांनी सांगितले. अवंतिकाचे यश ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू मुलांचा आत्मविश्वास वाढवणारे असून मेहनतीने नीटची लढाई जिंकता येते हे तिने दाखवून दिले आहे. अवंतिकाच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.