scorecardresearch

“रुपयाच्या अवमूल्यनामुळेच कापसाला ८ हजारांचा भाव”, विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले, “अमेरिकेत शेतकरी..”

कापसाच्या गाठींची निर्यात जर झाली नाही, तर देशात कापसाच्या गाठी शिल्लक राहतील आणि त्यामुळे कापसाचे दर कोसळतील, अशी भीती विजय जावंधिया यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

“रुपयाच्या अवमूल्यनामुळेच कापसाला ८ हजारांचा भाव”, विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले, “अमेरिकेत शेतकरी..”
विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र (लोकसत्ता ग्राफिक्स)

अमरावती : सद्यस्थितीत कापसाचे जगातील बाजारातील भाव हे १९९४-९५ मध्ये मिळालेल्या दरापेक्षाही कमी आहेत. भारतातील शेतकऱ्यांना सध्या ८ ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तो केवळ डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे. गेल्यावर्षी अमेरिकेतील शेतकऱ्यांनी १ डॉलर ७० सेंटमध्ये प्रतिपाउंड रुईची विक्री केली, आज त्यांना केवळ एक डॉलरचा भाव मिळत आहे, तरीही तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत नाहीत, असा खडा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात विचारला आहे.

जगातील बाजारात मंदीचे वातावरण असल्याने यंदा भारतातून कापूस आणि सोयाढेपेची (डीओसी) निर्यात थांबलेली आहे. अमेरिकेच्या कापूस बाजारात १९९५ मध्ये एक पाउंड रुईची (कॉटन लिंट) किंमत ही १ डॉलर १० सेंट इतकी होती. त्यावेळी भारतातील शेतकऱ्यांना कापसाचे २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते. त्यावेळी कापसाची आधारभूत किंमत केवळ १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होती आणि एक डॉलरचा विनिमय दर हा ३२ रुपये होता. आता परिस्थिती बदलली आहे. भारतातील शेतकऱ्यांना कापसाचे ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळेच हे दर मिळत आहेत. आज एक डॉलरचा विनिमय दर हा ८२ रुपये आहे. केंद्र सरकारने तर कापसाची किमान आधारभूत किंमत केवळ ६ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल इतकीच ठरवली आहे, याकडे विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – खर्च मर्यादा नसल्याने ‘शिक्षक’ची निवडणूकही महागली

साखरेप्रमाणे कापसाच्या निर्यातीला देखील प्रोत्साहन द्यायला हवे, अशी विनंती आपण याआधीच्या पत्रातून केली होती. कापसाच्या गाठींची निर्यात जर झाली नाही, तर देशात कापसाच्या गाठी शिल्लक राहतील आणि त्यामुळे कापसाचे दर कोसळतील, अशी भीती विजय जावंधिया यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

हेही वाचा – धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी, म्हणाला “मी अमर सिंह बोलतोय, धीरेंद्र शास्त्रीच्या…”

आपण ‘फाईव्ह-एफ’ची संकल्पना शेतकऱ्यांसमोर मांडली होती. त्यात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या दुव्यांचा उल्लेख केला होता. शेतमालावरील प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यातीचा हा प्रवास शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. ही आपलीच योजना आहे, पण दुर्दैवाने आज कापसाचे भाव कमी झाले आहेत. निर्यात देखील कमी झाली आहे. मात्र, कापडाचे दर कमी होऊ शकले नाहीत. एक लाख खंडी रुईचे भाव हे ६२ हजार रुपये खंडीपर्यंत घसरले आहेत. हा नफा कुठे जात आहे?, असा प्रश्न जावंधिया यांनी केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 18:26 IST

संबंधित बातम्या