चंद्रपूर : पावसाअभावी धान पीक हातचे गेल्याने कर्जबाजारी झालेल्या नागभीड तालुक्यातील मींथुर येथील ६५ वर्षीय शेतकरी मुखरू लक्ष्मण दडमल यांनी रविवारी (११ ऑक्टोबर) गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ८ वाजता ते तलावाकडे गेल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर मायक्रो फायनान्सचे कर्ज असल्याची माहिती दिली.
यंदा पावसाअभावी संपूर्ण धान पीक उद्ध्वस्त झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत ते होते. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी मदत किती आणि कधी मिळणार, याबाबतही चिंता होती.
घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजल्यापासून तलावात शोध घेण्यात येत आहे. वृत्त लिहिपर्यंत दडमल यांचा शोध लागला नव्हता.
