पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुणे जिल्ह्यातील आळेगाव येथील शेतकरी दशरथ केदारी यांनी आत्महत्या केली. आज रविवारी पांढरकवडा येथे केदारी यांच्या श्रद्धांजली सभेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर पुष्पार्पण करून गांधीगिरी आंदोलन केले.

हेही वाचा >>> चंद्रपूर : घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला, इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व या घटनेची दखल घेण्यासाठी शेतकरी नेते व शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या वतीने आज पांढरकवडा येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली हाती. या सभेत पंतप्रधान मोदी यांच्या नावे ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या करणारे आळे येथील शेतकरी दशरथ केदारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या पुष्पहार घातलेल्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पार्पण केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. सरकार, न्यायव्यवस्था, नोकरशाही, लोकप्रतिनिधी यांचा कणा वाकला आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा यावेळी तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदी यांना कार्यक्रमातील महिला पुष्पार्पण करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे. त्यामुळे तिवारी यांच्या या कृतीविरोधात प्रशासनाकडून काय कारवाई होणार, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. आंदोलनात शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, प्रेम चव्हाण, अजय राजुरकर, अंकित नैताम यांच्यासह विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या शेतकरी महिला उपस्थित होत्या.