नागपूर : Nagpur Farmers Protest दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. परंतु, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, असा आरोप करीत शेतकऱ्यांच्या विविध संघटना दिल्लीच्या दिशेने निघाल्या आहेत. यातील काही शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्याने त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी अडवून धरली.काही शेतकरी चेन्नईहून दिल्लीकडे निघाले होते. त्यांना मध्य प्रदेशातील नर्मदापूरम रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रेल्वेगाडीतून उतरवले. हे शेतकरी जीटी एक्प्रेसने दिल्लीला जात होते. हेही वाचा >>> Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा… शेतकऱ्यांनी अशाप्रकारे रेल्वेगाडीतून उतरवण्याचा विरोध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अंदमान एक्स्प्रेसच्या एका डब्यात बसवण्यात आले. नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर इंटरलिंकिंग असोसिएशन तामिळनाडूचे अध्यक्ष अय्याकन्नू आपल्या ११४ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीला जात होते. यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. तामिळनाडूला कावेरी नदीचे पाणी देण्याच्या मागणीसाठी हे शेतकरी दिल्लीत आंदोलन करू शकतात, अशी माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस चेन्नईपासून शेतकऱ्यांचा मागावर होते. रविवारी मध्यप्रदेशातील नर्मदापूरममध्ये दिल्लीहून मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना गाडीतून उतरवण्यात आले. शेतकरी नेेता आणि कार्यकर्ते २७ जुलैला जीटी एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले. हेही वाचा >>> यवतमाळात पाऊस थांबायचे नाव घेईना, जनजीवन विस्कळीत; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू नर्मदापूरम रेल्वे स्थानकावर ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी तसेच आरपीएसएफचे जवान तैनात करण्यात आले होते. नर्मदापूरम येथून सुमारे ६५ शेतकऱ्यांना अंदमान एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री बसवून चेन्नईला परत पाठण्याची व्यवस्था करण्यात आली. ही गाडी सोमवारी नागपुरात आली. प्रशासनाने त्यांना परत जाणाऱ्या गाडीत तर बसवले पण त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. अन्नपाण्याची व्यवस्था केली नाही, असा आरोप करीत काही शेतकरी अंदमान एक्सप्रेसच्या इंजीनसमोर उभे झाले. त्यांनी रेल्वेगाडी रोखून धरली. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. या आंदोलनाची बातमी कळताच मध्य रेल्वे प्रशासनाने तिकडे धाव घेतली. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर प्रशासनाने सर्व आंदोलक शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतर शेतकरी आपल्या डब्यात बसले आणि रेल्वेगाडी चेन्नईकडे रवाना झाली. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही गाडी नियोजित वेळेपेक्षा सुमारे पाऊण तास विलंबाने सुटली.