चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात पीकहानी असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ६५ टक्केच शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा काढल्याने उर्वरित ३५ टक्के शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक हानीची नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना हा विमा घ्यावा लागतो. पण, २०२१ च्या तुलनेत यंदा पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. ३१ जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कृषी खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, २०२१ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा २६ जुलैपर्यंत ६५.२० टक्के शेतकऱ्यांनीच विम्याचे कवच घेतले. २०२१ मध्ये  राज्यातील ८४ लाख ८४ लाख ७,३२८ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. यंदा ही संख्या ५४ लाख ८१ हजार ६७४  आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या विदर्भातही पीक विमा काढण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. नागपूर विभागातील सहा जिल्ह्याचे एकूण प्रमाण ५२.३२ टक्के तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्याचे प्रमाण ५५.४१ टक्के आहे. म्हणजे निम्म्याहून अधिक शेतकरी पीक विम्याच्या कवचाबाहेर आहे. नुकसान भरपाई न मिळणे, जाचक अटी, शर्ती असणे व अन्य तत्सम कारणे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवण्या मागे असल्याचे सांगण्यात येते.