न्यायालयाच्या आडून शेतकरी आंदोलन दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर शेतकरी संतापले आहेत. फडणवीस यांचा ‘बिस्तरा’ गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते महादेव जानकर यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना दिली.शेतकरी आंदोलक महामार्गावर ठिय्या देत असताना सरकारने प्रथम बच्चू कडू यांच्याशी दुपारी संपर्क करून त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी दोन राज्यमंत्र्यांना पाठवतो असा निरोप दिला.

चार वाजताची वेळ ठरली. दोन पैकी एक राज्यमंत्री विमानतळावर आले पण दुसरे नागपुरात आलेच नव्हते. त्यामुळे वाटाघाटी झाल्याच नाही.अचानक दुपारी उच्च न्यायालयाचा निर्णय आला,आंदोलकांनी रस्ता रिकामा करावा,असे निर्देश दिले. त्यामुळे आंदोलक संतापले. सरकार न्यायालयाच्या आडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे,अशी भावना शेतकरी नेते व आंदोलकांची झाली. तशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ज्येष्ठ शेतकरी नेते महादेव जानकर यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले “ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिस्तरा गुंडाळल्या शिवाय आम्ही राहणार नाही. सरकार घालवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.