नागपूर : विदर्भात पुरामुळे झालेल्या हानीचे सर्वेक्षण केले जात असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितले.
पूर्व विदर्भात एकूण १ लाख ३४ हजार,८७१ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. त्यात सर्वाधिक हानी चंद्रपूर जिल्ह्यात (५५,९११ हे.) झाली. १ जून ते १८ जुलैपर्यंत एकूण ८५ लोकांचा मृत्यू झाला. ४५० जनावरे दगावली,९५०५ घरे पडली. दरम्यान मंगळवारी फडणवीस यांनी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेथून परतल्यावर ते माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टी व पुरामुळे पूर्व विदर्भात कापूस, सोयाबीन व धान पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली तर पश्चिम विदर्भात फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला. पुरामुळे घरांची फडझड झाली, जनावरांचेही मृत्यू झाले. सर्वच पातळीवरचे सर्वेक्षण केले जात असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल.
विदर्भात पूरस्थिती कायम, मायलेकीचा मृत्यू
विदर्भात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून अनेक मार्ग बंद आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील फुगाव येथे घर कोसळून मायलेकीचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा वेग कमी असला तरीही अप्पर वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. माजरी गावातील ९०० घरे पाण्याखाली असून गडचिरोली जिल्ह्यातील २३ रस्ते बंद आहेत. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वणा नदीच्या काठी शेडगाव मार्ग पुरामुळे खचल्याने वर्धा ते समुद्रपूर मार्ग बंद आहे. पुरामुळे मौजा ढगा येथे महादेव मंदिरात अडकलेल्या १३ जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आला आहे.