नागपूर: जाती- जातीत विष कालवून भांडणे लावण्याचे काम राजकीय नेते करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर आर्थिक मदत न दिल्यास २३ ऑगस्टला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यातच शेतकरी आत्महत्येचे प्रात्याक्षिक करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आम्ही सर्व चळवळीतील विदर्भातील लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आलो. सध्या जाती- जातीत विष कालवले जात असून मरणाच्या दारातील शेतकऱ्यांकडे राजकीय मंडळी दुर्लक्ष करीत आहे. सोयाबीन, कापूस, धान, दूध, संत्रा उत्पादक शेतकरी दुर्लक्षामुळे संकटात आहे. परंतु राज्यकर्ते मस्तीत मश्गुल आहे. सध्या धान, कापूस, सोयाबीन पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्माही भाव मिळत नाही. विदर्भातील संत्री उत्पादकांसह इतरही शेतकरी अडचणीत असून त्यांनाही मदत द्यावी. शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची मदत मिळाली नाही. त्यानंतरही पीक विमा कंपन्यांनावर कारवाई होत नाही. त्यामुळे सरकार- विमा कंपन्यांचे साट- लोट दिसते. सरकारने निर्यातीला प्रोत्साहन द्यायला हवे. सरकारकडून शेतकऱ्यांना ५- १० हजारांची मदत देऊन काहीच फायदा नाही. शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी मदत नको, तर प्रति क्विंटलवर मदत द्यावी. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सिमेंट कंपाऊंडसाठी मदत द्यावी. शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करावे, अद्यावत बियाने द्यावे, अशीही मागणी तुपकर यांनी केली. येत्या विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा २३ ऑगस्टनंतर राज्यभरात शेतकरी आंदोलन करतील, असाही इशारा तुपकर यांनी दिला.
हेही वाचा – देशमुख, राऊत यांच्या भोजनावळीत कुख्यात गुंड, नितेश राणे यांचे ट्विट
मुंबईत २३ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी निवडक शेतकरी आत्महत्येचे प्रात्याक्षिक करण्यासाठी जातील. त्यांना अडवल्यास राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन पेटल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहील, असेही तुपकर म्हणाले.
हेही वाचा – नागपुरातील १० ठाणेदारांच्या बदल्या; अवैध व्यावसायिकांशी संबंध भोवले…
मुख्यमंत्री शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरला
राज्यात मागणी नसतानाही सरकारने समृद्धी महामार्गासह इतर विकास प्रकल्पासाठी कोट्यावधी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यातून भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून तो लोकसभा निवडणुकीत वापरला. परंतु शेतकऱ्याला बांधावर जाण्यासाठी साधा रस्ताही दिला जात नाही. आता शक्तिपीठ मार्ग असो की अन्य कुठला मार्ग, शेतकरी आपली जमीन देणार नाही, रक्ताचे पाट वहिले तरी चालतील, असेही तुपकर म्हणाले.