अकोला : यंदाच्या खरीप हंगामात देखील कापसाच्या बियाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कापसाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा विशिष्ट वाणाचा आग्रह असतो. मात्र, त्या बियाण्याचे उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर कंपन्यांच्या वाणांची निवड करून लागवड करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिला.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर पिकांच्या बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची बाजारपेठेत मोठी टंचाई आहे. शेतकऱ्यांकडून अजित १५५ व अजित ५ या वाणांना मोठी मागणी असते. बाजारपेठेत त्याची कमतरता आहे. अजित सीडस या कंपनीने सर्व वाणांच्या सुमारे एक लाख २९ हजार २०० पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात केला.

अजित १५५ व अजित ५ या बियाण्याचे उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वेळोवेळी कंपनीला अकोला जिल्ह्यात वाणांचा पुरवठा करण्याचे सूचित केले. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनीही बैठकीत तसे निर्देश दिले होते व शासन स्तरावरही पाठपुरावा केला. मात्र, तरी देखील मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे ते बियाणे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. विशिष्ट बियाण्यांची कमतरता लक्षात घेऊन त्याचा काळाबाजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर वाणांची निवड करून लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चार लाख हेक्टरवर खरीप नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चार लाख ३२ हजार १० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकाची पेरणी केली जाईल. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र दोन लाख ४१ हजार ६४५, तर कापसाचे एक लाख २७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामासाठी बियाण्यांचे सोयाबीन ६३ हजार ४३१ क्विंटल, कापूस (बीटी) तीन हजार १८३ क्विंटल म्हणजेच सहा हजार ३६५ पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे.