नागपूर : वासना एकदा सारासार बुद्धीवर वरचढ झाली, की अशा व्यक्तींमध्ये नैतिक – अनैतिकतेची भिती उरत नाही. अशा लोकांना नात्यामधील नाजुकतेची लाजलज्जा देखील रहात नाही, असे म्हटले जाते. असाच काहीसा संतापजनक प्रकार राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये समोर येत आहे. वासनांध बापलेकाने तरुणीशी सहानुभुती दाखवत तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या दोघांना एका महिलेने साथ देत बाप लेकाच्या या किळसवाण्या कृत्याचे चित्रिकरणही केले. याची वाच्यता केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तरुणीला दिली. ही विचित्र घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आसीफ शेख (३०) आणि रफीक शेख (५६) अशी कल्याणी अशी या नराधम आरोपींची नावे आहेत. पीडित २९ वर्षीय तरुणी कल्पना (नाव बदललेले) पूर्वी चंद्रपूरला राहत होती. आसीफ शेखचे चंद्रपूरला कपड्यांचे दुकान आहे. ती तरुणी २०२१ मध्ये दुकानात कपडे घ्यायला आली. दरम्यान बील बनवण्यासाठी आसीफने तिला भ्रमणदूरध्वनी क्रमांक मागितला. त्यानंतर आसीफने कल्पनाला वारंवार संपर्क करुन दुकानात नवीन डिजाईनचे कपडे आल्याची माहिती दिली.

दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली असता तिने नकार दिला. तरीही तरुणी दुकानात कपडे खरेदीसाठी जात होती. आसीफने चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा बसविला. त्याने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनविला. तो व्हायरल करण्याची धमकी देत, त्याने बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. त्याने तरुणीकडे पैशांची मागणी सुरू केली. तरुणीने चंद्रपूर पोलिसांकडे तक्रार केली. आसीफ विरोधात चंद्रपूरात हा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. काही दिवसांतच त्याला जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर येताच, त्याने तरुणीला पुन्हा त्रास देणे सुरू केले. त्यामुळे तरुणी चंद्रपूर सोडून नागपुरात आली.

घरात घुसून लैंगिक अत्याचार

गेल्या १० जानेवारी ला सकाळी आसीफ आणि त्याचे रफीक शेख आणि एक कल्याणी नावाची महिला घरी आले. तक्रार मागे घेण्यासाठी तिघांनी पिडितावर दबाव टाकला. तिने नकार देताच आसीफने जबरदस्तीने तिला पकडून ठेवले आणि रफीकने अत्याचार केला. आसीफने व्हिडीओ चित्रिकरण करत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिासंनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.