म्युकरमायकोसिसशी संघर्ष; मेडिकल-दंत रुग्णालयाकडून इंजेक्शन देण्यास टाळाटाळ

नागपूर : अतिशय प्रेमात वाढवलेल्या पोटच्या लेकीला एका बेसावध क्षणी म्युकरमायकोसिसने गाठले. ऐन तारुण्यात हा आजार शरीर पोखरू लागला. हे बघून व्यथित वडिलाने मुलीला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. खासगी रुग्णालयाने  अम्फोटेरिसिन बी इंजेक्शनची चिठ्ठी सोपवली. जिल्हाधिकारी कार्यालयाने मेडिकल अथवा दंत रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सोबत पत्रही दिले. परंतु, मेडिकल-दंत रुग्णालयाकडून इंजेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या विवश पित्याच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नाहीयेत.

म्युकरमायकोसिसशी संघर्ष करणाऱ्या या  २५ वर्षीय तरुणीला मधुमेहही आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयांत उपचार सुरू  आहेत. नागपुरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी आवश्यक अँटी- फंगल इंजेक्शन असलेल्या ‘अम्फोटेरिसिन- बी’ इंजेक्शन चा तुटवडा आहे. त्यामुळे या तरुणीच्या वडिलाने कुठेही इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारून पाच इंजेक्शन मंजूर करून घेतले. जिल्हा प्रशासनाने शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालयातून इंजेक्शन घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र वडिलांना दिले. मात्र चार दिवसांपासून मुलीवरील उपचारासाठी इंजेक्शनची मागणी करीत ते मेडिकल आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत पायपीट करीत आहेत. मात्र दंत प्रशासनाने त्यांना परत पाठवले.  मुलीसाठी ‘अम्फोटेरिसिन- बी’ इंजेक्शनसाठी विविध रुग्णालयांत चकरा मारणाऱ्या वडिलांचे नाव डॉ. के. जी. माहेश्वरी आहे. त्यांची मुलगी सृष्टी रामदासपेठेतील अर्नेजा रुग्णालयात उपचार घेत आहे. तेथील डॉक्टरांनी ‘अम्फोटेरिसिन-बी’ची सोय करा असे सांगितल्यानंतर डॉ. माहेश्वरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या इंजेक्शनची मागणी केली. तेथील पत्र घेऊन ते शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालय येथे चार दिवसांपासून पायपीट करीत आहेत. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना भेटल्यानंतर त्यांनी  दोन दिवसांपूर्वी यायचे होते, असे सांगितले. परिणामी, मागील चार दिवसांपासून ‘अम्फोटेरिसिन-बी’हे इंजेक्शन मुलीला मिळालेले नाही. प्रशासाच्या या घोळामुळे माझ्या मुलीचे बरेवाईट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा संतप्त इशारा डॉ. माहेश्वरी यांनी दिला आहे.