गोंदिया : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला अवघे काही आठवडे उरले असून गोंदिया जिल्हा आणि शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांची वर्गणी पासून मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्ती, सजावट, देखावे आणि धार्मिक कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला असतानाच महाप्रसादाच्या आयोजनासाठी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा उत्सवाच्या जल्लोषासोबत अन्नसुरक्षेच्या नियमांचेही भान मंडळांना ठेवावे लागणार आहे.
गणेशोत्सवात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. मात्र मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करताना स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, साठवणूक आणि वितरणाची सुरक्षितता याकडे दुर्लक्ष झाल्यास भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासना कडून महाप्रसादाच्या आयोजनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
महाप्रसादासाठी मंडळांना ऑनलाइन अर्ज करून नोंदणी व आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मंडळाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र तसेच एका पदाधिकाऱ्याचे ओळखपत्र आवश्यक आहे. महाप्रसाद तयार करणाऱ्या कॅटरर्सनाही नियमानुसार परवानगी घेता येणार आहे.
नियम जुनाच ; यंदा अंमलबजावणी कठोर
सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करून वाटप करण्यासाठी परवानगी घेण्याचा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र विभागात मनुष्यबळाचा अभाव, मंडळांची मोठी संख्या आणि विविध कारणांमुळे त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. यंदा मात्र नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
“ सर्व गणेशोत्सव मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रशासनाशी संपर्क साधून अर्ज करावा आणि नियमांचे पालन करावे. परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अमृता शिर्के यांनी दिला आहे.
त्यामुळे गणपती बाप्पाच्या भक्तीत रंगण्यापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महाप्रसादाच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पेलणे आवश्यक ठरणार आहे.
