बुलढाणा : नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यापासून कारवाईचा धडाका लावला आहे. यामुळे भेसळखोरामध्ये खळबळ उडाली असून सर्व सामान्य नागरिकांत या कारवाईचे व्यापक स्वागत होत आहे.
खामगावातील कारवाईने खळबळ
दरम्यान खामगाव येथील मधील ए एम ऑईल्स प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट नं. ए -१४) या कंपनीवर धाड टाकून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे बोगस खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. येथे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना खाद्यतेलाचे उत्पादन सुरु असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती.
काय झाली कारवाई?
प्राप्त माहितीच्या अन्न औषध प्रशासनच्या पथकाने कंपनीवर अचानक छापा टाकला. तपासणीत कंपनीकडे खाद्यतेल उत्पादनाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या गोदामात मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे निकृष्ट आणि बोगस खाद्यतेल आढळले. विभागाच्या वरिष्ठ सूत्रानुसार, या प्रकल्पत विनापरवाना आणि मानकांचे पालन न करता खाद्यतेलाचे उत्पादन सुरु होते. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. हा संपूर्ण साठा आम्ही सील केला असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
तेल वितरणाचा शोध
धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीने यापूर्वी मोठ्या प्रमाणात हे बोगस तेल बाजारात वितरित केले आहे. हे तेल बुलढाणा जिल्ह्यासह कुठे-कुठे पाठवण्यात आले, कोणत्या किराणा दुकानदारांना किंवा हॉटेल व्यावसायिकांना विकले गेले, याचा शोध आता प्रशासन घेत आहे. वितरित झालेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खामगाव काही कंपण्यांची मनमानी उघड झाली आहे. अश्या कंपन्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी कसे खेळतात ही गंभीर बाब देखील दिसून आली आहे. दुसरीकडे भेसळखोरांचे धाबे दणानले आहे.
