यवतमाळ : येथील लोहारा एमआयडीसी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या बोगस खवा आणि पेढा कारखान्याचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि विनापरवाना चालणाऱ्या या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत टाळे ठोकले.
कृष्णा पुसनाके, सचिन मनवर आणि प्रा. पाठे यांनी प्रशासनाला या प्रकरणी माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सणासुदीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते, नेमका याचाच फायदा घेत लोहारा एमआयडीसीमध्ये आरोग्याला घातक अशा बोगस खवा आणि पेढ्यांची निर्मिती केली जात होती. प्लॉट क्रमांक बी–४५, ॲडिशनल एरिया येथे सवाई सिंग राज पुरोहित यांच्या मालकीच्या ‘श्री डी. के. बेकरी अँड नमकिन’ या कारखान्यात हा गोरखधंदा सुरू होता.
सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, सचिन मनवर आणि शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे यांना या कारखान्याबाबत संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त महाजन यांना याची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप आणि लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित चौधरी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी कारखान्यावर धडक दिली. तपासणीदरम्यान कारखान्यात अस्वच्छतेचे साम्राज्य आणि भेसळीचे पुरावे आढळून आले. येथून सुमारे ५० ते ७० हजार रुपये किमतीचा बोगस खवा आणि पेढा जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शहराच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या कारखान्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. कारखान्यात राजस्थानचे चार कामगार असून त्यातील दोन अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. केवळ नफ्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, या कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.
‘मेड इन यवतमाळ’, लेबल गुजरातचे! या छाप्यात ग्राहकांची दिशाभूल करणारा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा बोगस खवा आणि पेढा यवतमाळच्या लोहारा एमआयडीसीत घाणेरड्या जागेत तयार केला जात होता. मात्र, विक्रीसाठी त्यावर गुजरातमधील प्रसिद्ध ‘कन्हैया कंपनी’चे लेबल आणि पॅकेजिंग वापरले जात होते. स्थानिक ग्राहकांना ‘ब्रँडेड’ माल असल्याचे भासवून त्यांच्या माथी हे भेसळयुक्त ‘विष’ मारले जात होते. या रॅकेटचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

