नागपूर : बाळासाठी पौष्टिक म्हणून खरेदी केलेल्या ‘हेल्थ मिक्स’ किंवा ‘न्यूट्रिशन पावडर’च्या आकर्षक नावामागे नियम टाळण्याचा प्रयत्नही असू शकतो. प्रत्यक्षात शिशु अन्न असलेल्या उत्पादनांना वेगळी नावे देऊन विक्री करणे, पाकिटांवर आवश्यक इशारे नसणे आणि समाजमाध्यमांतून प्रतिबंधित प्रचार करणे, असे प्रकार महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरासाठी अनुपालन आदेश जारी केला आहे.
आकर्षक नावांबाबत नेमका आक्षेप काय?
उत्पादनाची ओळख केवळ नावावरून ठरणार नाही. घटकसंरचना, अपेक्षित वापर, वय, आहारसूचना आणि विपणन तपासले जाईल. शिशु अन्नाची मानके टाळण्यासाठी ‘बेबी सीरिअल’, ‘हेल्थ मिक्स’, ‘स्टेज फूड’, ‘न्यूट्रिशन पावडर’ किंवा ‘ट्रॅडिशनल मिक्स’ अशी नावे वापरता येणार नाहीत. तपासण्यांत परवान्याशिवाय व्यवसाय आणि मान्यता नसलेल्या घटकांचा वापरही आढळल्याचे आदेशात नमूद आहे.
पाकिटावर कोणती माहिती आवश्यक आहे?
‘आईचे दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे’, हे विधान ठळकपणे असावे. लागू उत्पादनांवर वय, घटक, पोषणमूल्ये, तयार करण्याची पद्धत, साठवण, बॅच क्रमांक आणि अंतिम वापर दिनांक आवश्यक आहेत. लागू निर्बंधांनुसार बाळाची किंवा मातेची चित्रे आणि उत्पादनाला आदर्श ठरवणारा मजकूर वापरता येणार नाही.
जाहिराती आणि मोफत नमुन्यांवर काय निर्बंध आहेत?
शिशु दूध पर्याय, फीडिंग बाटल्या आणि शिशु अन्नाचा कायद्याने प्रतिबंधित प्रचार करता येणार नाही. समाजमाध्यमे, प्रभावक, संकेतस्थळे आणि ऑनलाइन बाजारपेठांनाही हे निर्बंध लागू आहेत. प्रतिबंधित मोफत नमुने, भेटवस्तू, कूपन, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रलोभने आणि प्रचारासाठी माता किंवा गर्भवतींशी संपर्क साधण्यावरही निर्बंध आहेत.
ऑनलाइन विक्रेत्यांना काय करावे लागेल?
विक्रेत्याचा वैध परवाना पडताळून अनिवार्य माहिती खरेदीपूर्वी दाखवावी लागेल. उत्पादन सीलबंद आणि योग्य नाममुद्रणासह असावे. नियमांचे पालन न करणारी उत्पादने तात्काळ विक्रीसूचीतून काढून आवश्यकतेनुसार परत मागवावी लागतील. कालबाह्य, खराब किंवा छेडछाड झालेले पॅक विकता येणार नाहीत.
मानवी दुधाच्या विक्रीबाबत काय म्हटले आहे?
खासगी संस्थांकडून मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांचे संकलन, प्रक्रिया, विक्री व जाहिरात थांबवण्याचे निर्देश आहेत. त्याच्या अनधिकृत व्यापारीकरणाला परवानगी नसल्याचे आदेश स्पष्ट करतो.
आदेशाची अंमलबजावणी कधी होणार?
आदेश तात्काळ लागू आहे. उत्पादक, आयातदार आणि ब्रँडमालकांना परवाने, मानके, नाममुद्रण व प्रचाराचे स्वपरीक्षण करून कागदपत्रांसह अनुपालन घोषणा ३० दिवसांत द्यावी लागेल. ही मुदत प्रतिबंधित प्रचार किंवा असुरक्षित उत्पादनांची विक्री सुरू ठेवण्याची सवलत नाही. उल्लंघनानुसार जप्ती, उत्पादने परत मागवणे, परवाना निलंबन किंवा रद्द करणे आणि खटल्याची कारवाई होऊ शकते.
