लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ४८ तास झाले, बछड्यांचा शोध काही लागेना… ‘ती’ कासावीस झाली, बछड्यांच्या शोधासाठी वणवण भटकू लागली. अखेर बछड्यांचा ठावठिकाणा तिला कळला. वनविभागानेही तिची बछड्यांसोबत भेट घडवून आणण्यासाठी ट्रॅप रचला. शेवटी आई ती आईच… ती बछड्यांसाठी त्या ट्रॅपमध्ये शिरली अन् अलगद पिंजऱ्यात अडकली. अखेर तिची बछड्यांसोबत भेट झाली. सोबतच वन विभागाचा जीव भांड्यात पडला अन् गावकऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. मादी बिबट आणि तिच्या तीन बछड्यांची ही कथा…

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ब्रम्हपुरी वन विभागाच्या बाळापूर खुर्द येथे बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने गावकऱ्यांच्या बकऱ्या, गायी आणि बैल ठार केले होते. यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते. अशातच, हा बिबट्या गावातील एका घरातून बाहेर पडताना एका व्यक्तीस दिसला. गावकऱ्यांनी घरात येऊन चौकशी केली असता घराच्या एका कोपऱ्यात बिबट्याचे तीन बछडे दिसून आले. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

आणखी वाचा-राजा शरीफच्या बँक खात्यातून रक्कम काढणारा अटकेत

मादी बिबट आणि तिच्या तीन बछड्यांची ताडातूट झाली होती. यामुळे बिबट्याला जेरबंद करून पिल्लांची भेट घडवून आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने बाळापूर येथे दाखल झाले. यानंतर हालचाल करीत ज्या घरात मादी बिबट्याने बछड्यांना जन्म दिला, त्या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली. बिबट्याने गावात प्रवेश करू नये म्हणून गावाच्या बाजूने जाळी लावण्यात आली. तसेच बिबट्यास जेरबंद करण्याच्या उद्देशाने घराजवळ एक पिंजराही ठेवण्यात आला. या बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी दोन दिवस कॅमेरा ट्रॅपसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बछड्यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारीही बोलावण्यात आले होते.

तब्बल ४८ तास बछड्यांपासून दूर असलेली मादी बिबट बछड्यांच्या भेटीसाठी त्या घरात आली आणि बछड्यांजवळ ठेवलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकली. मादी बिबट पिंजऱ्यात अडकताच सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. हजारे यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बिबट्याची आणि बछड्यांची तपासणी केली. यानंतर बिबट्याला बछड्यांसह जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. वन विभागाच्या पुढाकाराने ताटातूट झालेल्या आई आणि बछड्यांची अशा पद्धतीने भेट घडून आली. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी आतापर्यंत ७२ वाघ व बिबट्याना जेरबंद करण्याचा विक्रम केला आहे.

आणखी वाचा-बाळासाहेबांच्या वैचारिक अध्यायाचा हा चिंताजनक प्रवास – मुनगंटीवार

रानडुकराची दुचाकीला धडक, एक ठार

मुल तालुक्यातील उथळपेठ येथील शेतकरी मारोती तुळशीराम बोबाटे (४०) व पत्नी अंतकला मारोती बोबाटे (३५) हे दोघेही दुचाकीने मानोरा येथे पन्हे काढण्यासाठी दाबगाव मार्गाने जात असताना दाबगाव व डोंगर हळदीच्या मधात रानडुकराने दुचाकीला धडक दिली. यात मारोती बोबाटे यांचा मृत्यू झाला. सध्या रानडुकरांनी या भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.