scorecardresearch

महिला तक्रारकर्त्यांविषयी मानसिकता बदलणे आवश्यक

प्राध्यापक, विभाग प्रमुख अशा वरच्या पदावरील व्यक्तींच्या विरोधात महिलांनी तक्रार केली की, आधी तक्रारकर्त्यांच्या विरोधातच असंख्य प्रश्न उभे करून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.

विद्यापीठ छळ प्रकरणावर विद्यार्थिनींची भूमिका ; लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट
नागपूर : प्राध्यापक, विभाग प्रमुख अशा वरच्या पदावरील व्यक्तींच्या विरोधात महिलांनी तक्रार केली की, आधी तक्रारकर्त्यांच्या विरोधातच असंख्य प्रश्न उभे करून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे योग्य नाही. अशा प्रकरणात प्रशासनाची आणि समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका नेहा ठोंबरे, पल्लवी वानखेडे आणि ॲड. रुद्राक्षी मेंढे यांनी मांडली. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्या बोलत होत्या.
ज्या प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा असते तेच विद्यार्थिनींना आरोपीसारखी वागणूक देत असेल तर न्याय कसा मिळणार, असा सवाल या विद्यार्थिनींनी उपस्थित केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांच्याविरोधात पीएच.डी. करणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी मानसिक आणि आर्थिक छळाची तक्रार केली आहे. यावर बोलताना ॲड. रुद्राक्षी मेंढे म्हणाल्या, विद्यापीठाने या प्रकरणात चौकशी समितीची स्थापना करताना आरोपीचे नाव लपवून तक्रारकर्त्यांचे नाव जाहीर करणे गैर आहे. अशा कारणांमुळेच महिला तक्रार देण्यास समोर येत नाहीत. आज केवळ दोन टक्के महिला समोर येतात. त्यांनाही जर प्रशासन निष्पक्ष न्याय देऊ शकत नसेल तर अशा व्यवस्थेवरून विद्यार्थ्यांचा विश्वास उडेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नेहा ठोंबरे म्हणाल्या, विद्यापीठातील हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. विद्यापीठ प्रशासन या संपूर्ण प्रकरणात कुठेही गंभीर दिसत नाही. चौकशी समितीचे डाेके आणि जीभ गुलाम नसेल तरच त्या विद्यार्थिनींना न्याय मिळणे शक्य आहे. त्यामुळे समितीची पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. पल्लवी वानखेडे यांनी यावेळी सरकारच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमाचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, विद्यापीठातील या घटनेनंतर मागील काही वर्षातील शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर सरकारची ही घोषणा फोल ठरते. अनेक मुली तर तक्रारच करत नाहीत आणि तक्रार केलीही तरी विशिष्ट विचाराचे प्रशासन त्यांना न्याय देईल अशी अपेक्षा धुसर असते. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी सक्षम अशी यंत्रणा उभी राहायला हवी, असे त्या म्हणाल्या.
…तर कुलगुरूंचा राजीनामा घ्यावा
विद्यार्थिनींनी तक्रार दिल्यावरही विद्यापीठ प्रशासन गंभीर नव्हते हे स्पष्ट झाले आहे. आरोपीला सोडून विद्यार्थिनींचे नाव विद्यापीठ जाहीर करून त्यांची बदनामी करीत आहे. चौकशी समितीमध्ये जर हिंदी विभागाशी संबंधित लोक असतील तर न्यायाची अपेक्षा कशी करावी, असा आरोपी करीत या संपूर्ण प्रकरणास जबाबदार असणाऱ्या कुलगुरूंचाच राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी पल्लवी वानखेडे यांनी केली.
लिंगभेद नको, समानता हवी
आपण कितीही प्रगत झालो तरी समाजाची महिला आणि पुरुष ही भेदभावाची मानसिकता बदलेली नाही. याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थिनींना भोगावा लागतो. महिला किंवा पुरुष हे दोन्ही समान आहेत. लिंगभेद नको, दोघांनाही समान वागणूक द्या. तरच महिलांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्षम होता येईल, असे ॲड. रुद्राक्षी मेंढे म्हणाल्या.
‘तारीख पे तारीख’ नको
या प्रकरणातील चौकशी समितीने एक कालबद्ध कार्यक्रम आखून विद्यार्थिनींना न्याय द्यावा. न्यायालयाप्रमाणे तारखांवर तारखा नकोत. तक्रार देणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रशासनाच्या दिरंगाई धोरणात त्यांच्या आयुष्याचा खोळंबा व्हायला नको, अशी मागणी नेहा ठोंबरे यांनी केली.
आमच्या कपड्यांवर भाष्य करणारे तुम्ही कोण?
विद्यार्थिनींच्या कपड्यांवरून अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, आम्ही काय घालावे, काय घालू नये हे सांगणारे तुम्ही कोण? आमच्या मर्यादा आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे कुणी कसे राहावे, काय घालावे हे सांगण्यापेक्षा अशा मानसिकतेच्या लोकांनी स्वत:ची प्रवृत्ती सुधारावी, असेही या विद्यार्थिनी म्हणाल्या.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Female students university harassment cases goodwill loksatta office women complainant needs change amy

ताज्या बातम्या