बुलढाणा: हॉटेलमध्ये भोजनावरून ग्राहक आणि मालक, कर्मचाऱ्यात राडा झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील मूर्ती येथे घडली. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जेवणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ मोठ्या हाणामारीत होऊन यामध्ये किमान दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना मूर्ती शिवार परिसरातील हॉटेल आनंद सागर येथे घडली. या घटनेत परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील नेहरू नगरमधील रहिवासी योगेश गोपीचंद चव्हाण (वय २४ वर्षे) आणि त्याचा मित्र हर्षल पवार हा बुधवारी जानेवारीच्या रात्री साडेनऊच्या आसपास जेवण करण्यासाठी आनंद सागर धाब्यावर गेले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने कडाक्याचा वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीत होऊन हॉटेल मालक आणि दोन कामगारांनी योगेशला लोटपाट करून शिवीगाळ केली. तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद योगेशने बोरखेडी पोलिसांत दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५, ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, हॉटेल मालक हसन शहा उमर शहा (वय ३० वर्षे राहणार कोथळी, तालुका मोताळा )यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी योगेश चव्हाण आणि हर्षल पवार हे लोखंडी रॉड घेऊन धाब्यावर आले. त्यांनी काउंटरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध केला असता, यातील योगेशने आपल्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. तसेच आपल्या वडिलांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, हॉटेलवर आलेल्या योगेशचा भाऊ, योगेश आणि हर्षल या तिघांनी धाब्यावरील प्लास्टिक खुर्चा, टेबल आणि काउंटरची तोडफोड करून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार बोरखेडी पोलिसांत केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश चव्हाण, हर्षल पवार आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ११८(१), ११५, ३२४ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बोराखेडी परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लु, बळीराम खंडागळे हे करीत आहे.