लोकसत्ता टीम

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात १७ उमेदवार कायम असून, येथे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच थेट निवडणूक होईल, हे स्पष्ट झाले.

निवडणुकीत महायुतीकडून रिंगणात असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील महल्ले या बाजी मारतात की, महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे उमेदवार असलेले संजय देशमुख हे बाजीगर ठरतात, हे ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्यारतत २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत १८ अर्ज बाद झाल्याने २० उमेदवार रिंगणात होते. यापैकी अपक्ष उमेदवार वैशाली संजय देशमुख, कुणाल जानकर आणि सवाई पवार यांनी आज नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र त्यांनी आज माघार घेतल्याने संजय देशमुख यांनीच खबरदारी म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येते.

आणखी वाचा-माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…

मतदारसंघात आता १७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे छाननीत रद्द करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात वंचितचे अभिजित राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार होती. हा निकाल वृत्त लिहिपर्यंत लागायचा आहे. या निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वंचित रिंगणाबाहेर आहे. निकालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात थेट दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले. सध्यातरी मतविभाजनाचा धोका टळला आहे. बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड हे रिंगणात आहेत. मात्र बसपामुळे मतविभाजन होईल, असे चित्र नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे खरी लढत ही महायुतीकडून रिंगणात असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील महल्ले व महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यातच होणार हे स्पष्ट झाले आहे. संजय देशमुख यांच्या तुलनेत राजश्री पाटील या यवतमाळच्या राजकीय क्षेत्रात नवख्या उमेदवार असल्या तरी यवतमाळ त्यांचे माहेर असल्याने ‘सगेसोयरे’ त्यांच्या मदतीसाठी बाहेर निघाल्याचे चित्र आहे. शिवाय त्यांच्याकडे निवडणुकीच्या नियोजनात आवश्यक असलेली यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत संजय देशमुख यांचा पारंपरिक प्रचारावर अधिक भर आहे. शिवसेना उबाठा गटात गेल्यापासून संजय देशमुख हे मतदारसंघात जनसंपर्क ठेवून आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे.