scorecardresearch

शेगाव पोलीस ठाण्यात ‘राडा’, अवैध दारू विक्रीविरोधात कारवाईसाठी युवकाने फोडले स्वत:चेच डोके

अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी शेगाव शहर पोलीस ठाण्यात जमावाने एकच गोंधळ घातला.

crime police station
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बुलढाणा : अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी शेगाव शहर पोलीस ठाण्यात जमावाने एकच गोंधळ घातला. विशेष म्हणजे, तात्काळ कारवाई होत नाही म्हणून जमावातील एकाने चक्क पोलिसांसमोरच आपले डोके फोडून घेतले. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

शेगाव शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर भागामध्ये एक इसम मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री करीत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. वेळोवेळी पोलीस ठाण्याला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने काल गुरुवारी रात्री उशिरा या भागातील महिलांसह नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाईची मागणी केली.

हेही वाचा >>> धक्कादायक! अटक न करण्यासाठी मागितली लाच

सदर दारू विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ठाण्यात आणले. यावेळी विक्रेत्याने नागरिकांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यामुळे जमाव संतप्त झाला. दरम्यान, पोलीस कारवाईला उशीर करीत आहे, असा आरोप करीत जमावातील एका युवकाने स्वतःचे डोके जमिनीवर आपटून स्वत:ला जखमी करून घेतले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. दारू विक्री करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभारी ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी जमावाला शांत करून तात्काळ कारवाईची हमी दिल्याने जमाव शांत झाला व तणाव निवळला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:43 IST
ताज्या बातम्या