महेश बोकडे
नागपूर : संपावर गेलेले एसटीचे कर्मचारी हळूहळू कर्तव्यावर रुजू होत असल्यामुळे प्रवासी सेवा पूर्वपदावर येत आहे. मात्र, आता या कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या भडकवण्याचा प्रयत्न काही आंदोलक करीत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही प्रस्थापित संघटनांची सदस्यता पावती फाडू नका, आगार स्तरावर ‘लढा विलीनीकरण समिती’ स्थापन करून पुढे आंदोलन केले जाईल, असे संदेश कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅरप समूहावर काही आंदोलकांकडून प्रसारित केले जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे महामंडळाचे लक्ष नसल्याचे दिसून येते.
मान्यताप्राप्त व इतर प्रस्थापित कामगार संघटनांनी आंदोलनात काहीच मदत केली नाही. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी लढा सुरूच ठेवावा लागणार असून त्यासाठी ‘लढा विलीनीकरण समिती’ आवश्यक आहे, असे व्हॉट्सअॅप संदेशात नमूद करण्यात आले आहे. हे संदेश वाचल्यावर काही कर्मचारी महामंडळाविरोधात तीव्र भावना व्यक्त करत आहेत. कर्मचाऱ्यांना भडकावण्यामागे नेमके कोण आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

काही आंदोलक ‘लढा विलीनीकरण समिती’ स्थापन करण्याचे संदेश व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. नोंदणीकृत कामगार संघटनाच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाशी वाटाघाटी करू शकतात. त्यामुळे कामगारांना संभ्रमित करून संघटनेविरोधात भडकवणे चुकीचे आहे.-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)