गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेबरोबरच महाविकास आघाडीवर टीका केल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात भाजपा आणि मनसे विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्ष असा वाद सुरु आहे. राज ठाकरेंनी १२ एप्रिल रोजी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये त्यांनी मंचावरुन तलवार उंचवून दाखवल्यानंतर त्यांच्याविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अशाच प्रकारचा गुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करावा अशी मागणी मनसेनं केली आहे. नागपूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी सुद्धा राज यांच्याप्रमाणे मंचावरुन तलवार उंचावून दाखवल्याचा दावा मनसेनं केलाय.
नक्की वाचा >> …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेची मागणी
संजय राऊत यांचे नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतले जात आहेत. २१ तारखेला राऊत यांच्या एक कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट म्हणून दिली. त्यानंतर राऊत यांनी मंचावरुन तलवार उंचावून कार्यकर्त्यांना दाखविली. याच प्रकरणी आज नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आहे. संजय राऊतांविरोधात आर्म अॅक्टनुसार कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेनं केल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे विदर्भ सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिली.




राज ठाकरेंविरोधात नेमका काय गुन्हा दाखल झालाय?
महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी राज ठाकरेंविरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स अॅक्टचं उल्लंघन केल्याचा ठपका राज यांच्यावर ठेवण्यात आलाय. तलवार दाखविल्याप्रकरणी त्यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे १२ तारखेला सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भगवी शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर राज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढून ती उंचावून दाखवली. नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कायदा कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.