गोंदियातील बोंडगावदेवी गावात गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्या लांब जंगलामध्ये सोडण्यात आले आहे.

बकरीची केली होती शिकार
अर्जुनी मोरगांव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे मागील दोन दिवसापासून बिबट्यांच्या वावर वाढल्याने नागरीकांमधे प्रचंड दहशत पसरली आहे. २२ मे रोजी बिबट्याने रात्री अंदाजे साडेतीन वाजेच्या दरम्यान बोंडगांव देवी येथील यादोराव नारायण बोरकर यांचे गोठ्यातील बकरीची शिकार केली. बकरीचे संपुर्ण मास खाल्ल्यानंतर बिबट्या जवळच शेतशिवार लागून असल्याने दिवसभर जवळपासच वास्तव्यास होता.असे अनेक प्रत्येकदर्शीचे म्हणणे आहे. २४ मे रोजी सांयकाळच्या सुमारास अंदाजे पाच साडेपाचच्या दरम्यान अनेकांना हा बिबट दिसला. लोकांनी ‘बिबट आला’ ची हाक लावताच शेकडो लोक बिबटला पाहायला गेले.

बिबट्या बघायला लोकांची गर्दी

बघ्यांची गर्दी दिसताच सदर बिबट्याने कुंडलिक बोरकर यांच्या घराशेजारील आंब्याच्या झाडावर चढून बसला होता. बिबट झाडावर चढला ही माहिती गावात पोहचताच मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी एकच गदारोळ झाल्याने बिबट्याने झाडावरून उडी मारुन जवळच असलेल्या नामदेव बोरकर यांचे घरात प्रवेश करुन तिथेच ठाण मांडले. बिबट झाडावर आहे. म्हणून नामदेव बोरकर यांचे घरातील मंडळी बिबट्याला पाहण्यासाठी बाहेरच असल्याने मोठा अनर्थ टळला. जमलेल्या लोकांनी लगेच घराचे दरवाजे बंद करून घरात बिबट शिरल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक राऊत, दिलीप मुनेश्वर घटनास्थळी दाखल झाले. सात साडेसातच्या दरम्यान वनविभागाची टीम आपल्या साहित्यासह घटनास्थळी पोहचली. त्यांनी घराच्या मागील दरवाज्याला पिंजरा लावला. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडे दहा वाजता बिबट पिंज-यात अडकला.