केवळ आपल्या विचारसरणीचे सरकार असल्याने काहीही खपवून घेणे चुकीचे आहे. मराठी माणसाला घोषणांचे फसवेपण लक्षात येत नाही. विचार भावनिकपणे न करता तो बुध्दीनेच करायला हवा. त्रुटी मांडायला हव्यात आणि विद्यमान मोदी सरकारच्या बाबतीत तेच करीत असल्याची प्रांजळ कबुली देत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘थेट भेट’ या मुलाखतीदरम्यान सामाजिक, आर्थिक, राजकीय, पत्रकारिता, व्यक्तिगत प्रश्नांना सहज उत्तरे दिली.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या राजकारणाचा संदर्भ देत मराठी माणसाने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष द्यायला हवे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. सुधीर गाडगीळ यांनी संवादक म्हणून जबाबदारी सांभाळली.
इलेक्ट्रॉनिक पदवीधर असलेले कुबेर हे ठरवून या क्षेत्रात आले. काही वृत्तपत्रांचे संपादकीय वडील आवर्जून वाचून घेत आणि त्याची उजळणी घेत असल्याने वाचनाचा संस्कार घरातूनच होता. ‘लोकसत्ता’त अरुण टिकेकर आणि कुमार केतकर या संपादकांचे दडपण कधीच नव्हते. ‘कारण काय करायचे नाही’ याविषयी स्पष्टता होती. राजकीय बातमीदारीपेक्षा खरी बातमी आर्थिक आहे. मात्र आपल्याकडील अर्थसाक्षरता प्राथमिक स्वरुपातील आहे. ‘शेअर मार्केट’ला सट्टा बाजार म्हणणे चुकीचे असून अनेक मराठी माणसे ‘फंड मॅनेजर’ असल्याची आठवण करून देत आर्थिक साक्षरता महत्त्वाची असल्याचे कुबेर म्हणाले.
लोकांना वाचायला आवडत नाही, हे थोतांड असून असा अपप्रचार पत्रकारितेतील लोकच पसरवतात याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. संपादक निवृत्त झाल्यावर राज्यसभेवर जाण्यापेक्षा चांगली ग्रंथसंपदा त्याच्या नावावर असावी. आजचा तरुण वक्ता दशसहस्रेषु, लोकांकिका, ब्लॉग बेंचर्ससारख्या उपक्रमातून पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे व्यक्त होतोय. त्याला समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडतो, अशा शब्दांत कुबेर यांनी तरुणाईचे कौतूक केले. पत्रकारितेत गोविंद तळवलकरांचा आदर्श असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांच्या ८५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ११ अध्यक्षीय भाषणांचे संकलन ‘बोलू कवतिके’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

चमचमीत घोषणा फसव्या
‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या चमचमीत घोषणा फसव्या असून त्यासाठी मोदी सरकारला जमीन हस्तांतरण कायदा, कामगार सुधारणा कायदा, बँकिंग सुधारणा कायदा आणि कर सुधारणा कायदा आणावा लागेल, असे कुबेर म्हणाले.