आर्थिक अनियमितता; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश

नागपूर : ‘बार्टी’च्या अधीनस्थ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळल्याने सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार आहे.

समता प्रतिष्ठानला गेल्या तीन वर्षांत दिलेल्या १६ कोटी रुपये खर्चाचा हिशेब देता आला नाही. तसेच निविदा न काढता काम दिले गेले किंवा निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रारीनंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार या संस्थेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी होणार आहे.

समतादूत प्रकल्पावर झालेल्या खर्चाचा हिशेबही द्यावा लागणार आहे. जाहिरात न देता या प्रकल्पात दूत नेमण्याची चौकशी होणार असल्याने नागपुरातील प्रतिष्ठानच्या कार्यालयातील कर्मचारी आणि प्रकल्प अधिकारी तसेच समतादूत यांचे धाबे दणाणले आहे. समतादूत प्रकल्पासाठी जाहिरात देऊन भरती करण्यात आली नाही. त्याऐवजी खासगी कंपन्यांकडून मनुष्यबळ मागवले होते.

तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधीनस्थ बार्टीने समता प्रतिष्ठान संस्था आणि समतादूत प्रकल्प सुरू केला. यासाठी खासगी कंपनीने मनुष्यबळ पुरवले होते. मात्र योगायोगाने महत्त्वाची पदे माजी मंत्री बडोले यांचे खासगी सचिवांच्या नातेवाईकांना मिळाली होती.

नातेवाईकांची नियुक्ती..

’ माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांचे बंधू पंकज माने यांची समतादूत प्रकल्प संचालक म्हणून, तर त्यांच्याच दुसऱ्या नातेवाईकाची प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यासंदर्भात मंत्रालयाकडे तक्रार आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २० जुलै २०२० रोजी प्रकाशित केले होते.

’ यात सनदी लेखापाल यांच्या अहवालात आर्थिक त्रुटीवर बोट ठेवण्यात आले. प्रतिष्ठानने निविदा प्रक्रिया न राबवता कामे दिली किंवा निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली.

’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले.

’ या समितीत समाज कल्याण आयुक्त, पार्टीचे महासंचालक राहणार आहेत. एक महिन्यात समितीला अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. सर्व संबंधितांवर कारवाई झाली तरच चौकशीला अर्थ राहणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती कार्यक्रमावरील खर्चात अनियमितता झाली आहे. यासंदर्भात तक्रार करून चार वर्षे झाली.

– ई. झेड. खोब्रागडे, निवृत्त सनदी अधिकारी,अध्यक्ष, संविधान फाऊंडेशन