महापौरांच्या घोषणा दीड महिन्यांत पूर्ण होणार?

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने विविध विकास कामांवर जोर दिला आहे.

शहरात समस्यांचा डोंगर; सर्वसामान्य नागपूरकरांमध्ये नाराजी

नागपूर :  महापौरपद स्वीकारताना दयाशंकर तिवारी यांनी  ७५ प्राथमिक रुग्णालयांसह अनेक  योजनांची घोषणा केली होती.  मात्र सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती आणि निवडणुकीला उरलेला तीन महिन्यांचा काळ  बघता इतक्या अल्प काळात या योजना प्रत्यक्षात कशा उतरणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने विविध विकास कामांवर जोर दिला आहे. फेब्रुवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत आहे. फडणवीस सरकारच्या काळात पाठवण्यात आलेले अनेक प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. ५०० कोटींच्यावर देणी बाकी असून उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला आहे. सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. सिमेंट रस्त्यांची कामे, अर्धवट  कामे यामुळे महापालिकेवर सर्वसामान्य नागपूरकर नाराज आहेत. महापालिकेला करापासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने अभय योजना सुरू केली मात्र तिला फारसा प्रतिसाद नाही. भांडेवाडीमध्ये सुरू असलेला प्रकल्प अर्धवट आहे. शहरातील डांबरी रस्त्याचा प्रश्न कायमच आहे. रस्त्याच्या कामासाठी २६ कोटी रुपये मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही.

शहरातील मैदाने, उद्याने विकसित करून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण  झालेले नाही. शिवाय ऑरेंज सिटी प्रकल्प, साई क्रीडा केंद्र, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, बीओटी तत्त्वावर महालातील व सक्करदरातील बुधवार बाजार,  कमाल चौक येथील व्यापारी संकुल, २१३ कोटींची अमृत योजना, भूमिगत गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकूल आणि अंबाझरी ओपन थिएटर, जरीपटका मार्केट, सोख्ता भवनमध्ये व्यापारी संकुल, महिला उद्योजिका भवन – शहरातील चित्रकार, शिल्पकारासाठी कलानगराची निर्मिती व आर्ट गॅलरी या गेल्या पाच वर्षातील सत्तापक्षाने केलेल्या घोषणा अजूनही केवळ कागदावर आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि  त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. त्यामुळे महापौरांकडे केवळ एक ते दीड महिना आहे. इतक्या कमी काळात दिलेली आश्वासने कशी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

या घोषणा कागदावरच…

 • ७५ वंदेमातरम् प्राथमिक रुग्णालय (हेल्थ पोस्ट )
 • माजी खासदार स्व.अनसूयाबाई काळे समुपदेशन केंद्र
 • अतिक्रमणमुक्त फुटपाथ
 • ई हॉकर्स धोरण 
 • ७५ स्मार्ट उद्यान
 • लाडली लक्ष्मी योजना
 • सुपर ३० च्या धर्तीवर सुपर ७५
 • जनावरांसाठी वाठोडा परिसरात नंदग्राम

या घोषणा पूर्णत्वाकडे…

 • सहा झोनमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा
 • विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेत कक्ष
 • स्पर्धा परीक्षांसाठी  मार्गदर्शन केंद्र
 • दंत चिकित्सा व नेत्रतपासणी आरोग्य शिबीर
 • सहा जलकुंभांचे भूमिपूजन
 • सोनेगाव व गांधीबाग तलाव सौंदर्यीकरण भूमिपूजन
 • मॉडेल मिलजवळील रस्ता भूमिपूजन
 • गांधीबाग उद्यान सौंदर्यीकरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Financial position of the corporation plan mayor dayashankar tiwari akp

ताज्या बातम्या