नागपूर : ‘तुमच्या घरातील मीटरमध्ये गडबड आहे. तुम्हाला तीन लाख रुपये दंड पडेल. कारावासही होऊ शकतो.’ अशी धमकी देऊन ५० हजार रुपये उकळणाऱ्या विद्युत महामंडळाच्या पथकावर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपींमध्ये दिलीप फुंडे (उपकार्यकारी अभियंता),जगदीश वर्मा (चालक), भूषण अंबादे (वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि पंच तेजेश्वर पिने अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन

विद्युत महामंडळाचा अभियंता दिलीप फुंडे याने झटपट पैसे कमविण्यासाठी कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन वीज ग्राहकांना धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा गोरखधंदा सुरु केला. त्याने आतापर्यंत अनेकांना धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसूल केली. तो गुरुवारी भरारी पथकाला घेऊन एमआयडीसीतील पारधीनगरात राहणारे सराफा व्यवसायी राजेंद्र वारजूरकर यांच्या घरी गेला. वीज मीटरमध्ये गडबड असून त्यांच्या पत्नीला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. तीन लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा होणार असल्याची धमकी देऊन त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडून बळजबरीने ५० हजार रुपये उकळून पळ काढला.

हेही वाचा >>> नागपूर: गृह मतदानाच्या तीन दिवसानंतर वृद्धाचा मृत्यू, मतदान ठरले शेवटचे

काही वेळातच त्यांचा शेजारी तेथे आला. त्याच्याही पत्नीकडून ३० रुपये उकळल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि ठाणेदार प्रवीण काळे, नितीन राजकुमार यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी वस्तीत आणखी ग्राहकांच्या शोधात असलेल्या भरारी पथकाच्या गाडीचा पाठलाग केला. काही अंतरावर चौघांनाही ताब्यात घेतले. आरोपींनी खंडणी घेतल्याची कबुली दिली आणि रक्कमही पोलिसांनी जप्त केली. या टोळीने गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीचा धंदा सुरु केला होता. आतापर्यंत या पथकाने लाखो रुपयांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.