अमरावती येथील जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयाच्‍या शिशू कक्षाला रविवारी सकाळी आग लागल्‍याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन विभागाने वेळीच पोहचून आग विझवल्‍याने भीषण अनर्थ टळला. पण, आगीच्‍या धुरामुळे अनेक चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. शिशू कक्षात दाखल असलेल्‍या बालकांना दुस-या कक्षात सुरक्षितपणे हलविण्‍यात आले आहे.

हेही वाचा- परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

आगीवर नियंत्रण

रविवारी सकाळी जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयातील बेबी केअर सेंटरमधून धूर येत असल्‍याचे तेथील परिचारिकांच्‍या लक्षात आले. त्‍यांनी लगेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले. या शिशू कक्षातील बालकांना दुस-या कक्षात हलविण्‍यात आले. पण, या दरम्‍यान धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली. त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात येत आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला असून अग्निशमन विभागाच्‍या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.