नागपूर : शहरातील विविध  कचराघरांना आगी लागत असल्यामुळे त्याचा फटका महापालिकेच्या  अग्निशामक दलाला सोसावा लागत आहे. गेल्या महिनाभरात १० ते १२ ठिकाणी अशा आगीच्या घटना घडल्या. या ठिकाणची आग विझवल्यावर तो  खर्च कोणाकडून घ्यायचा, याबाबत महापालिकेत कुठलेही धोरण नाही.

जरीपूटका भागातील कामगार नगरातील नाल्याजवळ कचराघर असून बुधवारी सकाळी अचानक कचऱ्याने पेट घेतला आणि पहाता पहात आगीचा भडका उडाला. या नाल्याला लागून कामगारांची वस्ती असल्यामुळे आग पसरू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले.  अशीच घटना गेल्या आठवडय़ात घडली.  पांढराबोडी परिसरात हिल टॉप येथील कचराघराला आग लागली आणि त्यामुळे शेजारी असलेल्या सदाशिव अपार्टमेंटमधील तीन सदनिकामधील सामान जळले. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी महापालिकेच्या तीन गाडय़ा घटनास्थळी आल्या. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना या  आगी लागण्याच्या घटना वाढत आहेत. या सर्व आगी विझविताना आर्थिक भुर्दंड मात्र अग्निशमन विभागाला बसत आहे.

आठवडय़ातून पाच ते सहा घटना

एखाद्या घराला किंवा दुकानाला लागलेली आग विझवल्यानंतर त्यांच्याकडून अग्निशामक विभागाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी झालेला खर्च वसूल करीत असतात. मात्र शहरात  कचऱ्याला आग लागल्याचे आठवडय़ातून पाच ते सहा कॉल येत आहेत. ही आग विझवण्यावर होत असलेल्या खर्चाची वसुली कोणाकडून करायची असा प्रश्न अग्निशमन विभागाला सध्या पडला आहे.