अमरावती : आगीच्या घटना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव यामुळे भविष्यात गंभीर संकटाचा सामना करावा लागू नये, म्हणून महापालिकाही दक्ष झाली आहे. शहरातील खासगी शिकवणी वर्ग‍ महापालिकेच्या रडारवर आहेत. या वर्गांना अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे, त्या न केल्यास ३१ मे पासून असे शिकवणी वर्ग बंद करण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाजगी शिकवणी वर्गाच्या वापरासाठी महापालिकेकडून नियमानुसार परवानगी न घेता, अनेक इमारतींमध्‍ये अनधिकृतपणे शिकवणी वर्ग चालवले जात आहेत. या इमारतीमध्‍ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना तसेच नियोजनाच्या दृष्‍टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नसल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या जिवीतास, आरोग्‍यास आणि मालमत्‍तेस धोका उत्पन्न होऊ शकतो. त्‍यामुळे महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ कलम ३७६ अ अन्‍वये खाजगी शिकवणी वर्ग करीत असलेला शैक्षणिक वापर ३१ मे पासून बंद करण्‍यात येणार आहे. २८ तारखेपर्यंत नाहरकत प्रमाणपत्र सादर न केल्‍यास ३१ मे पासून इमारतीतील शैक्षणिक वापर महानगरपालिकेमार्फत बंद करण्‍यात येईल असे डॉ. प्रवीण आष्‍टीकर यांनी सांगितले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नोंदीनुसार शहरात गेल्या तीन महिन्यांत आगीच्या १३५ लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. यात जीवितहानी झाली नसली, तरी मालमत्तेचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही दिवसांपुर्वी बसस्थानक मार्गावरील शिवाजी संकुलात एका दवाखान्याला आग लागली होती. या दवाखान्याच्या वर असलेल्या शिकवणी वर्गातील शंभरावर विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire safety measures in private tuition classes amravati municipal commissioner zws
First published on: 24-05-2022 at 19:32 IST