शाळांचा पहिला दिवस उत्साहात

नागपूर : शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत.. पहिल्या दिवशी पुस्तकांचेही वाटप.. वर्गात नानाविध खेळणी आणि खाऊचीही रेलचेल.. पण तरीही प्रथमच शाळेत आलेल्या चिमुरड्यांना आई-बाबांचे बोट सोडवेना.. मुलांचा पडलेला चेहरा आणि सभोवतालची गंमत दाखविण्याची धडपड करत पालकांनी चिमुकल्यांना शिक्षकांच्या हाती सोपवणे . बुधवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी असेच वातावरण होते.

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर अखेर शाळेची पहिली घंटा वाजली. अनेक प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती. तर दुसरीकडे पूर्व प्राथमिक गटातील चिमुरड्यांनी पहिल्यांदाच पालकांसोबत शाळेत पहिले पाऊल टाकले. नव्याची नवलाई असली तरी सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी जय्यत तयारी केली होती. शाळेचा पहिला दिवस प्राथमिक विद्यालयांमध्ये उत्साहात साजरा झाला. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.