नागपूर : महामुंबई क्षेत्रातील खाडय़ा, पाणथळ भागात गुलाबी पंख असलेले फ्लेमिंगो (रोहित पक्षी) मोठय़ा संख्येने येतात. मात्र, या वर्षीचे वेगळेपण दिसून आले. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या संशोधकांनी २०२१-२२ या वर्षांत पहिल्यांदाच ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ची सर्वाधिक संख्या नोंदवली.

डिसेंबर २०२१ आणि मार्च २०२२ दरम्यान ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात ५४ हजार ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ दिसले, तर शिवडी आणि न्हावा येथे अनुक्रमे १७ हजार २२७ या जातीचे फ्लेमिंगो दिसले.  बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी २०१७ पासून या प्रदेशात फ्लेमिंगो सर्वेक्षण करत आहेत. मुंबईच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवास क्षेत्राचा नकाशा तयार करणे आणि त्यांची गणना करणे तसेच मुंबई पारबंदर प्रकल्पाचा फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांवरील परिणामांचा अभ्यास करत आहे. या प्रकल्पाला मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून निधी दिला जात असून कांदळवन कक्षाद्वारे देखरेख केली जातेर्. एप्रिलदरम्यान ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, शिवडी-न्हावा आणि लगतच्या क्षेत्रात मोठे आणि लहान मिळून अंदाजे एक लाख ३३ हजार फ्लोमिंगोंचे निरीक्षण करण्यात आले. २०२०-२१ मध्ये फेब्रुवारीदरम्यान एक लाख तीन हजार फ्लेमिंगो, २०१९-२० मध्ये फेब्रुवारीदरम्यान ९६ हजार ४०० आणि २०१८-१९च्या मार्चमध्ये एक लाख २० हजार फ्लेमिंगो आढळले. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत लहान फ्लेमिंगोची संख्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात ६५ हजार, शिवडी येथे २५ हजार आणि न्हावा येथे नऊ हजार होती. या प्रजातीच्या संख्येमध्ये या वर्षी तिन्ही ठिकाणी किरकोळ वाढ झाली. २०२१-२२ या वर्षांत ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ची सर्वाधिक संख्या नोंदवली.

स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही रामसर विभागासाठी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात प्रमाणीकरण प्रस्तावित केले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.

– वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व कांदळवन कक्ष प्रमुख

गेल्या काही वर्षांत ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ची संख्या कमी होती. करोनाच्या निर्बंधामुळे मार्च ते मे दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले नाही. साधारणत: या तीन महिन्यांत फ्लेमिंगोची सर्वाधिक संख्या दिसून येते. त्यामागील कारणांचा शोध आम्ही घेत आहोत.

– राहुल खोत, उपसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी