scorecardresearch

‘आरटीओ’त प्रथमच महिलांसाठी ‘सावित्री पथक’ !

नागपुरात महिला दिनी हा उपक्रम सुरू होणार असून तो यशस्वी ठरल्यास राज्यातील इतरही भागात राबवला जाण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यात कुठेही स्वतंत्रपणे महिलांना वाहतुकीचे नियम, रस्ते सुरक्षिततेबाबत समुपदेशनासाठी महिला कर्मचाऱ्यांचे पथक नाही. नागपुरात मात्र राज्यातील पहिले सावित्री पथक तयार करण्यात आले आहे. 

सार्वजनिक वाहनाचे चालक बहुतांश पुरुषच असतात. हे  चित्र बदलण्यासाठी परिवहन विभागाने खास महिलांकरिता अबोली रिक्षा ही योजना २०१६ मध्ये आणली. परंतु नागपुरात ३ ते ४ अबोली रिक्षांची नोंदणी वगळता फारसा प्रतिसाद नाही. याचे कारण  महिलांना स्वतंत्रपणे रस्ते सुरक्षिता, वाहन कशाप्रकारे ठेवावे, महिलांना वाहनाच्या मदतीने कसा रोजगार देता येईल, असे मार्गदर्शन करणारे महिला अधिकाऱ्यांचे पथक नाही.

ही बाब लक्षात घेऊन नागपूर शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील रस्ते सुरक्षितता समिती, जिल्हाधिकारी कार्यालयासोबत समन्वय साधून  शहर, ग्रामीण, पूर्व नागपूर आरटीओतील केवळ महिला अधिकाऱ्यांच्या सोबतीने महिलांच्या मदतीसाठी सावित्री पथक तयार केले आहे. हे पथक जिल्ह्यातील वेगवेगळय़ा भागात महिलांशी संपर्क साधून त्यांना केंद्र व राज्याच्या परिवहन योजनांबाबत माहिती देईल. पथकाचा उद्देश शिक्षण, प्रशिक्षण, अंमलबजावणी, जनजागृती, सामाजिक दायित्व असा आहे. नागपुरात महिला दिनी हा उपक्रम सुरू होणार असून तो यशस्वी ठरल्यास राज्यातील इतरही भागात राबवला जाण्याची शक्यता आहे.

उद्देश काय?

सावित्री पथक महिलांना आरटीओशी संबंधित सेवांची माहिती, वाहन चालवताना स्वत:सह वाहनांची घ्यायची काळजी, वाहनांबाबत तांत्रिक ज्ञान, वाहनांशी संबंधित विविध कागदपत्रे, रस्त्यावरील नियम सांगण्यासोबतच महिलांना रोजगारासह केंद्र व राज्याच्या योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी विमला आर. यांची असल्याचे  नागपूर शहरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.

सावित्री पथकात आरटीओतील ३ अधिकाऱ्यांसह कर्मचारी आहेत. ही संख्या पुढे आणखी वाढेल. हे पथक नागपूर जिल्ह्यातील मॉल, बाजार, शाळा येथे आठवडय़ातून एकदा भेट देऊन महिलांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती देईल. महिला व बालकल्याण, जिल्हा परिषदेसह इतर विभागातील काही सदस्य पथकात घेऊन महिलांना जास्तीत जास्त मदतीचे प्रयत्न केले जातील.

स्नेहा मेढे, प्रमुख, सावित्री पथक.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First savitri squad of maharashtra formed in nagpur zws

ताज्या बातम्या