अकोला : ॠतूराज वसंताच्या स्वागतासाठी आसमंत सज्ज होत आहे. त्यात आकाशही नव-नवीन खगोलीय घटनांची साथ देतांना दिसेल. १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. या सर्व मनमोहक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी खगोलप्रेमींनी सज्ज राहण्याचे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दोड यांनी केलेहिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधात फेब्रुवारी-मार्च महिन्यात वसंत ऋतू येतो.वसंत ऋतू म्हणजे हवा आल्हाददायक आणि निसर्गाला आलेला बहर असे समीकरण आहे.
त्यामुळे हा ऋतू आनंददायी असे सर्वसाधारणपणे मानले जाते. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते. नवचैतन्य, उत्कर्षाचा प्रतिक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी एक विशेष नाते आहे. निसर्गाचे नवचैतन्य, झाडांना येणारी नवीन पालवी, बहरलेली फुले आणि कोकिळेचे गाणे हे या ऋतूचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. या काळात वसंत पंचमी, होळी, गुढीपाडवा असे सण साजरे केले जातात. या वसंत ऋतुमध्ये अवकाशात घडामोडींची मोठी पर्वणी लाभणार आहे.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण
येत्या १७ फेब्रुवारी रोजी माघी अमावस्येला सूर्यग्रहण आहे. हे या वर्षातील पहिले ग्रहण असून ते अंटार्क्टिका भागात कंकणाकृती, तर प्रशांत आणि हिंदी महासागराच्या जवळच्या भागात खंडग्रास स्थितीत असेल. या निसर्गातील सावल्यांचा आनंद घ्यायला हवा. आपल्या भागात मात्र हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही, अशी माहिती खगोलतज्ज्ञ प्रभाकर दोड यांनी दिली.
आकाशात नवा पाहुणा दाखल
सद्यस्थितीत खूप दूरवरच्या ‘उर्ट क्लाऊड’ मधून आपल्या सूर्याभोवती दीहर्घ कालावधीनंतर प्रदक्षिणा पूर्ण करणारा ‘सी २०२४/ई१’ हा धुमकेतू दक्षिण पश्चिम आकाशात संध्याकाळी २२४ अंशावर बघता येईल. या नव्या धुमकेतूचा शोध गेल्या मार्च महिन्यात पोलिश खगोल अभ्यासक कॅस्पर विअर्सचोस यांनी लावला. अंतर अधिक आणि आकार लहान असल्याने मोठ्या दुर्बिणीतून ताे पाहता येईल.
बाजूला मीन राशीतील शनी आणि बुध व शुक्र ग्रह मात्र नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील. याचवेळी पूर्व आकाशात गुरु ग्रह ठळक दर्शनार्थ सज्ज असेल, असे प्रभाकर दोड म्हणाले.ऐन वसंत ऋतुमध्ये निसर्गासोबतच अवकाश देखील बहरत आहे. या कालावधीत अवकाशातील विविध घडामोडी खगोल प्रेमींसाठी उपयुक्त व माहितीपूर्ण राहणार असून त्याच्या अवलोकनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

