सहा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

नागपूर : करोना, म्युकरमायकोसिस, डेंग्यू, हिवताप या आजारानंतर आता नागपूर विभागात स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्यावर्षी या आजाराचा नागपूर विभागात एकही रुग्ण नसताना यंदा  महिन्याभराच्या काळात येथे सहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. परंतु या रुग्णाच्या मृत्यूच्या अंकेक्षणानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

स्वाईन फ्लू असताना दगावलेला हा पुरुष  रुग्ण भंडारा जिल्ह्य़ातील आहे. त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात झाला. हे प्रकरण मृत्यू अंकेक्षण समितीपुढे गेल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, नागपूर जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू नोंदवण्यात आले होते. करोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच येथे म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराने डोके वर काढले. या आजारातील बऱ्याच रुग्णांना  शस्त्रक्रियेत जबडा, डोळे, दात गमवावे लागले. त्यानंतर सध्या पूर्व विदर्भातील  बऱ्याच जिल्ह्य़ांत मोठय़ा संख्येने डेंग्यूसह हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत.

या आजाराने नागरिक बेजार असतानाच आता स्वाईन फ्लू आजाराच्या रुग्णांनी त्यात भर घातली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, गेल्या महिन्याभरात नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ६ रुग्ण आढळले. त्यात ४ पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ातील लॉ कॉलेज चौक, जरीपटका, रेल्वे कॉलनी (भिलगाव) परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. याशिवाय हिंगणघाटला १ आणि भंडारा जिल्ह्य़ात २ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांतील दोन गंभीर  रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी नागपूर विभागात स्वाईन फ्लूच्या एकाही रुग्णाची नोंद नव्हती. परंतु आता दोन रुग्ण नोंदवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी मेडिकलमध्ये नुकतीच विशेष वार्डाची सोय करण्यात आली असून तेथेही काही रुग्ण दाखल आहेत का, याबाबत रात्री उशिरापर्यंत मात्र माहिती मिळू शकली नाही.