scorecardresearch

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले ५ अर्भक, नागपुरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली.

NEW BORN BABY
नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अर्भक आढळले. (सांकेतिक फोटो)

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्वेटा कॉलनीतील केटी वाईन शॉपजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली असून मोठा ताफा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या केटी वाईन शॉपच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे. बुधवारी पाच वाजताच्या सुमारास एका युवकाला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये काहीतरी गुंडाळलेले दिसले. उत्सुकतेपोटी त्याने जवळ जाऊन बघितले असता त्यात रक्ताचे डाग असलेले विचित्र कापड दिसले. त्याला संशय आला. त्याने लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून करून माहिती दिली.

लकडगंज पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेण्यासाठी नागपूर फॉरेन्सिक विभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलावले. कचऱ्याच्या ढीगाऱ्यावरील पाचही अर्भक पथकाने ताब्यात घेतले. तेथे बाजूलाच एक बॉक्स आढळला. त्यात किडनी, हाडंही आढळली. त्यावरून ते बायोमेडिकल वेस्ट असल्याचे स्पष्ट झाले. पाचही स्त्रीअर्भक असून जवळपास ५ महिन्यांपर्यंतचे असल्याची चर्चा आहे. वैद्यकीय पथकाने अर्भकांना ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. परंतु, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

क्वेटा कॉलनीकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावरील सीओसीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलीस तपासणार आहेत. ते बायोवेस्ट कुणी फेकले, याचा शोध पोलीस फुटेजवरून घेणार आहेत. तसेच आजुबाजूच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीचेही फुटेज पोलीस ताब्यात घेणार आहेत.

खासगी रुग्णालयावर संशयाची सुई

मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या अर्भकांपैकी बहुतांश स्त्रीअर्भक आहेत. बेवारस पद्धतीने सापडलेली अर्भकं आणि बाजूला असलेली औषधांची पाकिटे यामुळे जवळपासच कुठेतरी अवैधरित्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

“क्वेटा कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काही अर्भके सापडली असून आमच्या वैद्यकीय पथकाने ती ताब्यात घेतली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येईल. अद्याप ते अर्भक किती आहेत किंवा कुणी टाकली याचा तपास सुरू आहे”, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five infants found in nagpur police started investigation prd

ताज्या बातम्या