बुलढाणा : यंदाचा प्रजासत्ताक दिन आगळावेगळा आणि भव्य ठरणार आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील तब्बल ५ लाख विदयार्थी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत व संचलन करणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुकास्थळी एकाच वेळी हा उपक्रम पार पडणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २४६७ शाळा सहभागी होणार आहे. शिक्षण विभागाच्या उच्च पदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, आरोग्य जागृती आणि देशभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमाने तसे निर्देश देण्यात आले आहे. देशभक्ती गीतांवर आधारित कवायतीचे संचलन करण्याचा उपक्रम राबवण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या २४६७ शाळांमधील पाच लाख विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी कवायत आणि संचलन करणार आहेत.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. यापूर्वी मागील १५ ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे कवायत संचलन केले होते. त्याच धर्तीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पुन्हा राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्र प्रथम ही भावना रुजावी आणि त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रत्येक शाळेत ही कवायत होणार असून तालुक्याच्या ठिकाणी एक तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना संबंधित गावातील व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती,शालेय भौतिक सुविधा विकसन समिती व गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक व स्थानिय लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे प्रयत्न विद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मैदानावर आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम बुलढाणा येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे देखील या सूत्रांनी सांगितले.