मातीच्या भरावामुळे उरण पनवेल महामार्गालगतची पाणथळे नष्ट होण्याच्या मार्गावर

मुंबई, नवी मुंबई प्रमाणेच उरणमधील पाणजे, जासई येथील दास्तान फाटा येथील पाणथळ्यावर हजारोंच्या संख्येने दरवर्षी फ्लेमिंगोसह इतर देशी-विदेशी पक्ष्यांची वर्दळ असते. यातील उरण पनवेल महामार्गा लगत असलेल्या दास्तान फाटा येथील पाणथळ्यावर जेएनपीटीकडून साडेबारा टक्के विकसित भूखंडासाठी मातीचा भराव सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे ठिकाण असलेले हे ठिकाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी या भागात पक्ष्यांचे खाद्य असल्याने अखेरची घरघर लागलेल्या या पाणथळांवर शेकडो फ्लेमिंगो अजूनही विहार करीत आहेत. त्यामुळे या पाणथळ्याचे संरक्षण व्हावे, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कांदळवण व पक्ष्यांचे अभयारण्य तयार करण्यात आले आहे. एकीकडे हे होत असताना उरणमधील पक्ष्यांची ठिकाणे असलेल्या पाणजे समुद्र व खाडी किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे कांदळवनात असलेली या पक्ष्यांची खाद्यांची ठिकाणे कमी होत आहेत. त्याचा परिणाम याठिकाणी येणाऱ्या हजारो पक्ष्यांच्या अन्नावरदेखील झाला आहे. उरणमध्ये अनेक ठिकाणी वर्षभरासाठी देशी-विदेशी पक्षी वास्तव्यास असतात.

मात्र त्यांच्यासाठी असलेल्या पाणथळ्याच्या संख्येत घट होऊ लागल्याने या पक्ष्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. अशाच प्रकारे खाडी किनाऱ्यावर असलेल्या दास्तान फाटा येथील पाणथळ्यावरच जेएनपीटीकडून मातीचा भराव सुरू आहे.

उरण परिसरात येणाऱ्या विविध पक्ष्यांची संख्या कायम आहे. या पक्ष्यांसाठी असलेले पाणथळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पर्यायी पाणथळे निर्माण न केल्यास निसर्गाचा समतोल ढासळणार आहे. त्यामुळे उरण परिसरातही पक्ष्यांसाठी राखीव पाणथळे जाहीर करण्याची मागणी होत आहे. शिवाय २०१८ पर्यंत दास्तान परिसरातील पाणथळे मातीच्या भरावामुळे नष्ट होणार असल्यामुळे उरणमध्ये येणाऱ्या पक्ष्यांना भविष्यात पाणथळे कमी पडणार आहेत.

-जयवंत ठाकूर, पक्षी प्रेमी.