आयुक्तांचा अर्थसंकल्प २४३४ कोटींचा; सांडपाणी प्रक्रियेसाठी राखीव निधी; कोणत्याही करवाढीची शिफारस नाही

महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर  यांनी  २०१८-१९ सुधारित आणि २०१९-२० चा प्रस्तावित २४३४ कोटींचा अर्थसंकल्प कुठलीही करवाढ न करता स्थायी समितीला सादर केला.

आयुक्तांनी त्यांच्या अर्थसंकल्पात स्थानिक स्वराज्य संस्था करातून ५७. ६ कोटी, शासनाकडून अनुदानापोटी ५९२ .८८ कोटी,  मालमत्ता करातून ४०० कोटी, पाणी करापासून १५५ कोटी, बाजार वसुली १४.५१ कोटी, नगररचना विभागापासून ७८.४५ कोटी,  स्थावर विभागातून ३.५ कोटी, जाहिरातीपासून १४ कोटी, अनुदान कर्ज गुंतवणूक अग्रिम व निक्षेप इत्यादीपासून ५५० कोटी उत्पन्न अपेक्षित आहेत.

अपेक्षित खर्च २४३४ कोटींचा असून यात कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ४४३.३४ कोटी, प्रशासकीय खर्च ६५.६० कोटी, सेवानिवृत्ती वेतन १५० कोटी, देखभाल दुरुस्ती खर्च ३२१.१२ कोटी, महापालिका योजनांसाठी आर्थिक अंशदान १७९.५० सुस्थिती भांडवली खर्च ३९८ कोटी आहे.

अर्थसंकल्पातील ४० टक्के रक्कम घनकचरा आणि सांडपाणी प्रक्रियेसाठी राखून ठेवण्यात आली आहे. याशिवाय शहरातील उद्यानाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात नासुप्रतर्फे मिळणाऱ्या जागेवर महापालिका उद्यान उभारणार आहे.

सीएनजी, इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहे. शिवाय ग्रीन बस नव्या ऑपरेटकरकडे  देण्यात येणार आहे. आरोग्य सेवा बळकटीकरणात इंदिरा गांधी रुग्णालय आणि पाचपावली सुतिकागृह यासह आणखी तीन रुग्णालयात  किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील मालमत्ताचे शंभर टक्के पुनर्सव्‍‌र्हेक्षण केले जात असून त्यात गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.