नागपूर : आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी असली तरी यातून सकारात्मक वृत्तीने बाहेर पडून मार्गक्रमण करा, असे भावनिक आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने करोनामुळे आई-वडील दगावलेल्या बालकांशी सोमवारी संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून बालकांशी ऑनलाईन संवाद साधला. गडकरी म्हणाले, कोणत्याही निराधाराकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मुलांनी सकारात्मक वृत्तीने आयुष्याचे नियोजन करावे. यावेळी मुलांना केंद्र व राज्याकडून होणाऱ्या १५ लाखाचे अर्थसहायाचे एकत्रित कागदपत्रे गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा हजारावर आहे. २७०० मुलांचे आई किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू झाला. ७९ मुलांचे आई आणि वडील दोघेही दगावले. या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड’मधून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. शिवाय, त्यांना वयाच्या २३ वर्षांपर्यंत मासिक विद्यावेतन आणि आयुष्मान भारत योजनेतून पाच लक्ष रुपयांच्या आरोग्य विम्याचे संरक्षणही पुरवले जाणार आहे. या संदर्भातील सर्व दस्तऐवज व स्नेह प्रमाणपत्र मुलांना वितरित करण्यात आलीत. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी विमला आर., महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

दु:खाची भरपाई अशक्य : पंतप्रधान

बालकांशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र, ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला, त्यांनाच मोठे होता आले. त्यामुळे खचून न जाता परिस्थितीला तोंड द्या.