लोकसत्ता टीम
नागपूर : एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने तरुणीच्या घरात घुसून प्रेमाची मागणी घालून अश्लील चाळे केले. आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ईश्वर संजय ब्राम्हणे (वय २३, रा. जरुड. जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खासगी वाहनचालक असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.




पीडित अल्पवयीन मुलगी १६ वर्षांची असून ती ११ वीला शिकते. मुलगी आणि आरोपी एकाच वस्तीत राहतात. जुलै २०२३ पासून आरोपी ईश्वर हा मुलीचा कॉलेजमध्ये जाताना पाठलाग करीत होता. त्याने एकदा तिला अडवून ‘तुझ्याशी मला बोलायचे आहे,’ असे म्हटले. परंतु, अल्पवयीन मुलीने बोलण्यास नकार दिल्यामुळे आरोपी ईश्वर संतप्त झाला होता. अशातच शनिवारी शनिवारी आरोपी ईश्वर रात्री १० वाजता अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या घरात घुसला. त्याने अश्लील वर्तन करून अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यावेळी आरोपीने जोरजोरात आरडाओरड करून अल्पवयीन मुलीला धमकी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
आणखी वाचा-युवकाला नग्न करून खून; उपराजधानी हादरवणाऱ्या पावनगाव हत्याकांडातील तिघांना अटक
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.